आतापर्यंत आपण माणसांचे एमआरआय स्कॅन पाहिले आहे. पण कधी कुठल्या सापाचे एमआरआय स्कॅन पाहिले आहे का ? मुंबईत चेंबूर भागात सध्या अशाच एका जखमी सापावर उपचार सुरु आहेत. बांबू पीट वायपर प्रजातीच्या या सापाचा पाठीचा कणा मोडला असून वेटनरी डॉक्टर दीपा कटयाल या सापावर उपचार करत आहेत. काही दिवसांपूर्वी दहीसर येथील हाऊसिंग सोसायटीतील एका घरामध्ये बांबू पीट वायपर प्रजातीचा हा साप आढळला होता.
स्थानिकांनी नेहमीप्रमाणे साप दंश करेल या भितीपोटी या सापावर लाठीने प्रहार केले. त्यामध्ये या सापाचा पाठीचा कणा मोडला. हाऊसिंग कॉलनीमध्ये साप असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या परिसरातील सर्प मित्र वैभव पाटील यांनी या सापाची सुटका केली. लाठीचे प्रहार झाल्याने जखमी झालेल्या या सापाला त्यांनी व्यवस्थित गुंडाळून एका बॅगमध्ये ठेवले असे अनिल कुबल यांनी सांगितले. कुबल सुद्धा सर्पमित्र असून त्यांच्याकडे वनखात्याचा रीतसर परवाना आहे.
त्यांनी तो साप दुसऱ्या सर्पमित्राकडे सोपवला. उदय कारंडे डॉक्टर दीपा कटयाल यांच्या क्लिनिकमध्ये तो साप उपचारासाठी घेऊन आले. या सापाला पाहताक्षणी त्याच्या पाठिला मार लागला असल्याचे डॉक्टर कटयाल यांच्या लक्षात आले. त्याच्या पाठिचा कणा थोडासा वाकलेला होता. सुरुवातीला या सापाच्या पाठिच्या कण्याचा एक्स रे काढण्यात आला. पण त्यातून फार काही साध्य झाले नाही.
त्यानंतर त्यांनी या सापाचे एमआरआय स्कॅन करण्याचा निर्णय घेतला. एमआरआय स्कॅन करण्यासाठी या सापाला रेडिओलॉजिस्ट डॉ. रवी थापर यांच्या क्लिनिकमध्ये नेण्यात आले. मानवी शरीराच्या एमआरआय आणि सीटी स्कॅनमध्ये डॉ. रवी थापर तज्ञ आहेत. या स्कॅनमध्ये सापाच्या पाठिच्या कण्याला मार लागला असल्याचे स्पष्ट झाले. डॉ. कटयाल यांनी या सापावर कोल्ड लेझर उपचार केले. या उपचार पद्धतीमुळे दुखण्याचा त्रास तसेच जळजळ कमी होते. डॉक्टर त्रिशा डिसूझा या सुद्धा या सापावर उपचार करत आहेत. बांबू पीट वायपर प्रजातीचा हा साप आता उपचारांना प्रतिसाद देत असून त्याच्या शरीराच्या मागच्या भागाची हालचाल आता सुरु झाली आहे.