एका वर्षात अहवाल
मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेला एमयूटीपी अंतर्गत मिळणाऱ्या २३८ वातानूकुलीत लोकल गाड्यांसाठी सर्वेक्षण करण्याचा निर्णय मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत (एमआरव्हिसी) घेण्यात आला आहे. त्यासाठी सल्लागारची नियुक्ती करण्यात आली असून एका वर्षात अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
एमयूटीपी ३ अंतर्गत ४७ आणि एमयूटीपी ३ ए अंतर्गत १९१ वातानुकुलीत लोकल मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांना मिळणार आहेत. निविदा आणि तांत्रिक तपशीलाच्या मंजुरीसाठी सध्या रेल्वे बोर्डाकडे याचा प्रस्ताव आहे. तोपर्यंत एमआरव्हिसीने या लोकल गाड्यांसाठी सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवर वातानूकुलीत लोकल सेवेत असल्या तरी काही प्रमाणात प्रवाशांची नाराजी आहे तर काही प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द करून वातानुकुलीत लोकल चालविणे, पासचे दर कमी न करणे इत्यादी कारणांमुळे या लोकल चर्चेत आहेत. मध्य रेल्वेवर बदलापूर, कळवा येथील प्रवाशांनी विरोध केल्याने वातानूकुलीत लोकलच्या दहा फेऱ्या रद्द करण्याशिवायही रेल्वेसमोर पर्याय राहिला नाही. त्यामुळे येत्या काही वर्षात एमयूटीपी अंतर्गत मेट्रो प्रकारातील वातानुकुलीत लोकल दाखल झाल्यास त्याचे नियोजन कसे असावे यासाठी सर्वेक्षण हाती घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा >>> मुंबई: प्रवाशांच्या सेवेत आता स्वच्छ, सुस्थितीतील एसटी गाड्या; बस, आगार आणि बस स्थानक स्वछतेसाठी कृती आराखडा
सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द न करता या वातानुकूलित लोकल फेऱ्यांचा समावेश कसा करावा, जलद किंवा धीम्या मार्गावर अधिक फेऱ्या असाव्यात, त्याला कोणत्या वेळेत प्रतिसाद मिळू शकतो, इत्यादींचा अभ्यास यातून केला जाणार आहे. त्यासाठी सल्लगाराची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. अंतिम अहवाल सादर करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी सल्लागार कंपनीला लागणार आहे. त्यापूर्वी कंपनीकडून काही महिन्यांनी एक मसुदाही सादर केला जाणार आहे.
जून २०२२ मध्ये रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी वातानुकूलित लोकल हे मुंबईचे भविष्य असून तिच्या सर्वसमावेशक सुधारणांसाठी एका विस्तृत योजनेवर काम करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
……
चौकट
नव्या २३८ वातानुकूलित लोकल मेट्रो पद्धतीच्या असतील. या लोकलचे डबे, अंतर्गत रचना, रंगसंगती मेट्रो डब्यांसारखे आकर्षक असतील. यातील आसनव्यवस्था वेगळी असेल. त्याची रचना मात्र सामान्य लोकलसारखी असेल. यात प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणी असे प्रकार नसतील. सध्या धावत असलेल्या वातानुकूलित लोकलमध्ये दिव्यांग आणि मालवाहतुक करणाऱ्या प्रवाशांसाठी स्वतंत्र डबा नसल्याने त्यांच्या प्रवासाचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे स्वतंत्र व्यवस्था असावी, अशी मागणी वारंवार होत होती. या मागणीनुसार त्यांच्यासाठीही स्वतंत्र व्यवस्था असणार आहे.