एमआरव्हीसीने प्रस्तावित केलेल्या तिकीटदर फेररचनेत महत्त्वाची सूचना
रेल्वे बोर्डाने हिरवा कंदील दाखवल्यास अवघ्या ५०० रुपयांमध्ये उपनगरीय रेल्वेच्या सर्व मार्गासाठीचा समावेशक पास काढण्याची सुविधा रेल्वे प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. या पासच्या आधारे प्रवाशाला महिनाभर मध्य, पश्चिम, हार्बर, ट्रान्स हार्बर अशा सर्व मार्गावर कितीही वेळा फिरता येणार आहे. द्वितीय श्रेणीसाठी ५०० रुपये असलेले हे शुल्क प्रथम श्रेणीच्या मासिक पाससाठी १५०० रुपये आहे.
मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाने रेल्वे बोर्डाकडे हा प्रस्ताव पाठवला आहे. प्रस्ताव मान्य झाल्यास ही पास सुविधा प्रवाशांना उपलब्ध होईल.
गेल्या आर्थिक वर्षांत रेल्वेने रेल शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांनी आपल्या सूचना मांडल्या होत्या. यात उपनगरीय प्रवाशांसाठी एक पर्याय उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. या पर्यायानुसार उपनगरीय प्रवासी ५०० रुपयांत द्वितीय श्रेणीचा एका महिन्याचा सर्वसमावेशक पास काढू शकतात. हा पास मध्य, पश्चिम, हार्बर, ट्रान्स-हार्बर या चारही मार्गावर उपनगरीय रेल्वेच्या हद्दीत अधिकृत असेल. त्यामुळे प्रवाशांना महिन्याभरात ५०० रुपयांमध्ये कुठेही फिरता येणार आहे. प्रथम श्रेणीसाठी ही रक्कम १५०० रुपये प्रस्तावित करण्यात आली आहे, असे मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांनी सांगितले.
उपनगरीय रेल्वेमार्गावर प्रवास करणाऱ्या सर्वच्या सर्व मासिक पासधारकांनी हाच पास काढला, तरी रेल्वेचा फायदाच होणार आहे. कोणताही मासिक पासधारक मजेसाठी प्रवास करत नाही. तो दिवसातून दोन वेळाच प्रवास करतो. तसेच एका वेळी तो एकाच ठिकाणी जात असतो. त्यामुळे यात रेल्वेचे नुकसान होणार नाही, असेही सहाय यांनी स्पष्ट केले. हा पास इतर पासपेक्षा वेगळा असेल. इतर पाससाठीचे शुल्क आणि या पाससाठीचे शुल्क वेगवेगळे असेल, असेही त्यांनी सांगितले.