स्पर्धा भरवून सफाईच्या कामांचा निषेध
मुंबईत गल्ली क्रिकेट, बाल्कनी क्रिकेट, बॉक्स क्रिकेट असे क्रिकेट खेळण्याचे विविध प्रकार असले, तरी शनिवारी त्यात ‘नाला क्रिकेट’ प्रकाराची भर पडली. पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नालेसफाईचे काम ६० टक्के पूर्ण झाल्याचा पालिका प्रशासन आणि सत्ताधारी सेना-भाजप यांचा दावा किती फोल आहे, हे दाखविण्यासाठी मनसेने चक्क एका नाल्यात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले. विशेष म्हणजे पालिकेतील ‘मनसे’चे नगरसेवक आणि माजी गटनेते दिलीप लांडे यांनीही प्रत्यक्ष नाल्यात उतरून क्रिकेटचा आनंद लुटला.
यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला असल्याने मुंबईची ‘तुंबई’ होण्याचीही शक्यता आहे. ही परिस्थिती टाळण्यासाठी महापालिका दरवर्षी पावसाळ्याआधी नालेसफाईचे काम हाती घेते. यंदाही मे महिन्याच्या मध्यावर पालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील नालेसफाईच्या कामांचा आढावा घेऊन ही कामे उत्तम चालली असल्याचे सांगत स्वत:चीच पाठ थोपटून घेतली.

Story img Loader