ज्येष्ठ नागरिकांचे मनसेचे तिसरे महाअधिवेशन रविवारी गिरणगावात होत आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या नव्या धोरणाला मनसेने तीव्र विरोध केला असून राज ठाकरे यासंबंधीची भूमिका या अधिवेशनात मांडणार आहेत
 सामाजिक न्याय विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या ज्येष्ठ नागरिक धोरणात वयोमर्यादेची अट ६० वर्षांवरून ६५ वर्षे केली आहे. त्यात ज्येष्ठ नागरिकांच्या हितासंबंधी सुधारणा केल्या गेलेल्या नाहीत. नवीन धोरणात बिगर शासकीय संस्थांच्या सूचना विचारात घेतल्या गेल्या असल्याचा मनसेचा आरोप आहे.
 ‘उमेद ज्येष्ठांची’ या सामाजिक संस्थेतर्फे सूचविण्यात आलेल्या एस.टी. भाडय़ात ५० टक्के सवलत, महागाई निर्देशांकानुसार व्याजदरात वाढ, गरजूंना वृद्ध वेतन मिळावे आदी सूचनांकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याचे मनसेने म्हटले आहे. शासनाच्या धोरणात केवळ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा विचार करण्यात आला असून खाजगी आस्थापनातून निवृत्त झालेले कर्मचारी आणि लाखो असंघटीत क्षेत्रातील कामगार या योजनेपासून वंचित राहणार आहे. त्यामुळे या धोरणात बदल घडविण्याची मागणी मनसेने केली आहे. रविवारी लालबागच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रिंडागणात होणाऱ्या या राज्यस्तरीय महाअधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपली भूमिका मांडणार आहेत.

Story img Loader