मुंबई : नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी – आमणे या शेवटच्या टप्प्यातील कामाला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वेग दिला आहे. या शेवटच्या टप्प्याचे ९७ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम सप्टेंबरपर्यंत पूर्ण करून आचारसंहिता लागू होण्यापूर्वी हा टप्पा वाहूतक सेवेत दाखल करण्याचा ‘एमएसआरडीसी’चा मानस आहे.
‘एमएसआरडीसी’च्या ७०१ किमी लांबीच्या समृद्धी महामार्गावरील नागपूर – इगतपूरी दरम्यानचा ६२५ किमी लांबीचा महामार्ग वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. तर इगतपुरी – आमणे या शेवटच्या टप्प्यातील ७५ किमीच्या महामार्गाचे काम सध्या सुरू आहे. हा टप्पा या आधीच वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र तांत्रिक अडचणी आणि आव्हानात्मक कामामुळे प्रकल्प पूर्ण होण्यास वेळ लागत असल्याचे ‘एमएसआरडीसी’चे म्हणणे आहे.
हेही वाचा : मुंबई पुढील दोन – तीन तास अतिमुसळधार पावसाचा इशारा
विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू होण्याआधी हा शेवटचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. याला ‘एमएसआरडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दुजोरा दिला.
समृद्धी महामार्ग ठाण्यातील आमणे येथे येऊन संपणार असला तरी आता पुढे हा महामार्ग मुंबई – वडोदरा महामार्गाला जोडण्यात येणार आहे. त्यानुसार इगतपुरी – शांग्रीला रिसॉर्ट, भिवंडी असा काही किमी लांबीच्या रस्त्याचेही काम ‘एमएसआरडीसी’ करीत आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये इगतपुरी – आमणे आणि आमणे – शांग्रीला रिसॉर्ट, भिवंडी दरम्यानचा महामार्ग वाहतूक सेवेत दाखल होईल. त्यामुळे सप्टेंबरअखेरीस नागपुर – मुंबई प्रवास आठ तासात पार करणे शक्य होईल.
भेगांची दुरूस्ती सुरू
समृद्धी महामार्गामुळे प्रवास अतिवेगवान झाला आहे. मात्र अपघात आणि दुर्घटनांमुळे महामार्ग चर्चेत आला आहे. नुकत्याच या महामार्गावरील छत्रपती संभाजी नगरजवळील रस्त्याला ४० मीटर लांबीच्या भेगा पडल्या आहेत. तर याच प्रकल्पाचा एक भाग असलेल्या शहापूर येथील निर्माणाधीन जोडरस्ता पुलावर भगदाड पडले आहे. दोन्ही ठिकाणच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याचेही स्पष्ट केले आहे.