मंगल हनवते
मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत बांधलेल्या २७ उड्डाणपुलांची संरचनात्मक तपासणी (स्ट्रक्चरल ऑडिट) ‘आयआयटी’मार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामाला पुढील महिन्यात सुरुवात करण्याचा एमएसआरडीसीचा मानस आहे. याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एमएसआरडीसीने १९९६मध्ये ५५ उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार यापैकी २७ उड्डाणपूल, ४ भुयारी मार्ग, एक रेल्वे ओव्हर ब्रिज, एक खाडीपूल, चार जंक्शन असे एकूण ३७ पूल बांधण्यात आले. हे सर्व पूल, भुयारी मार्ग सध्या चांगल्या स्थितीत असून त्यांची आवश्यकतेनुसार दुरुस्ती करण्यात येणार आहे, एमएसआरडीसीचे म्हणणे आहे.
पुलाची भार क्षमता, बेअरिंगची स्थिती, पुलाची मजबुती तपासण्यासह पुलाची दुरुस्ती करणे आवश्यक आहे का हे निश्चित करण्याच्या उद्देशाने ही संरचनात्मक तपासणी करण्यात येणार असल्याचेही एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्याने सांगितले. या कामासाठी किती खर्च येईल आणि कामास केव्हा सुरुवात करायची, तसेच काम कधीपर्यंत पूर्ण करायचे याची निश्चिती लवकरच करण्यात येणार आहे.
हेही वाचा >>>२०० गुणांच्या परीक्षेत २०० पेक्षा अधिक गुण! सुधारित निकाल लावण्याची ‘महाज्योती’वर नामुष्की
तपाणीसाठी प्राधान्य देण्यात येणारे २७ उड्डाण पूल…
सीएसटी उड्डाणपूल-चेंबूर, छेडानगर पूल-चेंबूर, अंधेरी घाटकोपर लिंक रोड पूल-चेंबूर, विक्रोळी पूल-विक्रोळी, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड पूल-कांजूरमार्ग, गोरेगाव – मुलुंड लिंक रोड पूल-मुलुंड, नितीन कास्टिंग पूल-ठाणे, गोल्डन डाईज पूल-ठाणे, कलिना वाकोला पूल-सांताक्रुझ, जयकोच पूल -जोगेश्वरी, आरे कॉलनी पूल-गोरेगाव, फिल्मसिटी पूल-गोरेगाव, राणीसती मार्ग पूल-मालाड, दत्तपाडा पूल-बोरिवली, नॅशनल पार्क पूल-बोरिवली, गांधीनगर (एलबीएस) पूल-कांजूरमार्ग, सायन उड्डाणपूल-शीव, लार्सन अॅण्ड टुब्रो पूल-पवई, बीएआरसी जंक्शन पूल-अनुशक्ती नगर, मानखुर्द पूल-मानखुर्द, वाशी पूल-वाशी, नेरुळ पूल- नेरुळ, सीबीडी बेलापूर पूल-सीबीडी बेलापूर, खारघर पूल-खारघर, तळोजा पुल-तळोजा, मानखुर्द भुयारी मार्ग पूल-मानखुर्द, कुतुब-ए-कोकण-मुखदुम-अली माहीम पूल-माहीम आणि लव्ह ग्रो पूल.
आवश्यकतेनुसार दुरुस्ती
सुरुवातीला २७ पुलांची प्राथमिक तपासणी करून प्राधान्यक्रमाने कोणत्या पुलाची संरचनात्मक तपासणी करणे आवश्यक आहे हे निश्चित केले जाणार आहे. यासाठी एमएसआरडीसी आणि आयआयटीमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. लवकरच यासंबंधीचा निर्णय अंतिम घेऊन पुढील महिन्यात कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. या कामासाठी वाहतूक ब्लॉक घ्यावे लागणार असल्याने त्यादृ्ष्टीनेही चर्चा करण्यात येत आहे. यानंतर शिफारशीप्रमाणे पुलांची आवश्यक ती दुरुस्ती करण्यात येणार असल्याचेही एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.