मुंबई : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग वाढवण बंदराला (जि. पालघर) जोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वाढवण बंदर-इगतपुरीदरम्यान द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. इगतपुरी-चारोटी द्रुतगती महामार्ग प्रत्यक्षात मार्गी लावण्यासाठी ‘एमएसआरडीसी’ने त्याचे संरेखन निश्चित केले आहे. त्यानुसार हा महामार्ग ८५ किमी लांबीचा असून संरेखनासंबंधीचा प्रस्ताव लवकरच राज्य सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी पाठवविण्यात येणार आहे.

इगतपुरी-चारोटीदरम्यानच्या द्रुतगती महामार्गाचे काम ‘एमएसआरडीसी’ करणार असून चारोटी-वाढवणपर्यंतचा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) बांधणार आहे. वाढवण बंदर इगतपुरीशी जोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर ‘एमएसआरडीसी’ने या महामार्गाचे संरेखन तयार करण्याच्या कामास सुरुवात केली होती. हे संरेखन आता पूर्ण झाले आहे. त्यानुसार इगतपुरी समृद्धी आंतरबदल मार्ग-चारोटी द्रुतगती मार्ग एकूण ८५ किमी लांबीचा असेल, अशी माहिती ‘एमएसआरडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली. आता या संरेखनास अंतिम मान्यता मिळविण्यासाठी त्याबाबतचा प्रस्ताव लवकरच राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, वाढवण-इगतपुरी महामार्ग वेगाने मार्गी लावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एमएसआरडीसी’ला दिले आहेत. त्यानुसार ‘एमएसआरडीसी’ने प्रकल्प मार्गी लावण्यासाठीच्या हालचालींनाही वेग दिला आहे.

हेही वाचा >>> ‘शक्तिशाली’ भारतासाठी ‘बलशाली’ भाजप आवश्यक

वाढवण ते नाशिकनागपूर जोडणी सुलभ

इगतपुरी-चारोटीदरम्यानचा मार्ग ‘एमएसआरडीसी’ बांधणार असून चारोटी-वाढवण बंदर मार्ग ‘एनएचएआय’ बांधणार आहे. वाढवण बंदरापासून सुरू होणार हा महामार्ग थेट इगतपुरी आंतरबदलाद्वारे समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे. त्यामुळे वाढवणहून थेट नागपूरला जाणे शक्य होणार आहे. दुसरीकडे वाढवण-इगतपुरी महामार्गावरून पुढे ‘एनएच ४८’ रस्त्याने थेट नाशिकला जाणेही शक्य होणार आहे. त्यामुळे वाढवण बंदर थेट नाशिक जिल्ह्याशीही अशाप्रकारे जोडले जाणार आहे.

अधिकाधिक जिल्हे जोडण्याचे नियोजन

● देशातील सर्वांत मोठे बंदर वाढवणमध्ये उभारण्यात येणार आहे. या बंदराशी राज्यातील अधिकाधिक जिल्हे जोडण्याच्या दृष्टीने सरकारचे नियोजन सुरू आहे. त्यानुसार समृद्धी महामार्ग वाढवण बंदराला जोडण्याचा निर्णय गेल्या वर्षी घेण्यात आला.

● वाढवण-इगतपुरी द्रुतगती महामार्ग प्रकल्पाचे नियोजनही त्यातूनच करण्यात आले. यासंबंधीचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकसत्ता’ने दिले होते. प्रस्तावित वाढवण-इगतपुरी द्रुतगती महामार्ग दोन टप्प्यांत बांधण्यात येणार आहे.

Story img Loader