मुंबई : सागरी किनारा मार्ग (कोस्टल रोड) प्रकल्पात मुंबई पालिकेकडून अतिरिक्त नेपीयन्सी रोड निर्गमन मार्ग (एक्झिट) प्रस्तावित करण्यात आला आहे. या निर्गमन मार्गाच्या बांधणीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) नेपीयन्सी रोड येथील कार्यलयाच्या काही जागेची आवश्यकता आहे. त्यानुसार पालिकेने एमएसआरडीसीकडे जागेची मागणी केली होती. मात्र, एमएसआरडीसीने ही जागा देण्यास स्पष्ट नकार दिल्याने आता हा अतिरिक्त निर्गमन मार्ग अडचणीत आला आहे.

प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत असा १०.५८ किमीचा सागरी किनारा मार्ग पूर्ण क्षमतेने वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. या सागरी किनारा मार्गात अमर सन्स उद्यान, हाजी अली आणि वरळी सी फेस असे तीन आंतरबदल मार्ग आहेत. त्यानुसार अमर सन्स उद्यान आंतरबदल मार्ग वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर ब्रिज कँडी, नेपियन्सी रोड आणि आसपासच्या रस्त्यांवरील वाहतुक वाढली असून वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे ब्रिच कँडी परिसरातील रहिवाशांनी नेपियन्सी रोडवर अतिरिक्त निर्मगन मार्ग अर्थात सागरी सेतूवरून येणाऱ्या वाहनांना बाहेर पडण्यासाठी आणखी एक मार्ग बांधण्याची लेखी मागणी काही दिवसांपूर्वी केली होती. यासाठी २५०० हून अधिक रहिवाशांच्या स्वाक्षऱ्यांचे पत्रही सादर करण्यात आले होते. रहिवाशांच्या या मागणीनुसार पालिकेने नेपियन्सी रोड येथे अतिरिक्त निर्गमन मार्ग प्रस्तावित केला. या मार्गासाठी नेपियन्सी रोड येथील एमएसआरडीसीच्या कार्यालयाच्या काही जागेची गरज होती. त्यानुसार जानेवारी २०२५ मध्ये या जागेची मागणी पालिकेने केली होती. पण, ही जागा देण्यास एमएसआरडीसीने स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे आता या अतिरिक्त निर्गमन मार्गाचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

म्हणून नकार

पालिकेने नेपियन्सी रोड येथील एमएसआरडीसीच्या कार्यालयाची काही जागा सागरी किनारा मार्गातील काही कामासाठी मागितली होती. मात्र, ही जागा देणे काही कारणाने शक्य नसल्याचे पालिकेला कळविण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. वांद्रे रेक्लेमेशन येथील एमएसआरडीसीच्या कार्यालयाचा ज्याप्रमाणे पुनर्विकास करून प्रकल्पांसाठी निधी उभा करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याप्रमाणे नेपियन्सी रोड येथील कार्यालयाचाही विकास करण्याच्यासाठी चाचपणी सुरू आहे. त्यामुळे ही जागा देता येत नसल्याचेही गायकवाड यांनी सांगितले. एमएसआरडीसीने जागा देण्यास नकार दिल्याच्या वृत्तास पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी लोकसत्ताशी बोलताना दुजोरा दिला आहे.