मुंबई : मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघातांचा प्रश्न गंभीर बनला असून सोमवारी रात्री ११.३० च्या सुमारास काम सुरू असताना झालेल्या अपघातात १७ कामगार ठार झाले. समृद्धी महामार्गावर काम सुरू असताना आतापर्यंत चार अपघात झाले असून सोमवारचा पाचवा अपघात तुलनेत मोठा होता. मात्र यापूर्वीच्या चार अपघातामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नव्हती. दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला याची चौकशी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) गर्डर बसविण्याचे काम करणाऱ्या चेन्नईतील व्हीएसएल कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
समृद्धी महामार्गाचे काम चार टप्प्यात आणि १६ पॅकेजमध्ये करण्यात येत आहे. चारपैकी नागपूर – शिर्डी आणि शिर्डी – भरवीर असे दोन टप्पे वाहतूक सेवेत दाखल आहेत. तर भरवीर – इगतपुरी आणि इगतपुरी – आमणे टप्प्यांचे काम सध्या वेगात सुरू आहे. तिसरा टप्पा दिवाळीदरम्यान पूर्ण होणार असून चौथा शेवटचा टप्पा डिसेंबरअखेरीस पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन होते. मात्र हा टप्पा तांत्रिक आणि अभियांत्रिकी कामाच्या दृष्टीने सर्वाधिक कठीण, आव्हानात्मक मानला जात आहे. या टप्प्यात तब्बल १२ बोगदे असून यातील एक बोगदा आठ किमी लांबीचा आहे. तर उर्वरित ११ बोगदे सरासरी एक किमी लाबीचे आहेत. कसारा घाटातून हे बोगदे जाणार असून या बोगद्यामुळे कसाराघाट अगदी पाच-सहा मिनिटात पार करता येणार आहे. त्याचवेळी या टप्प्यात १६ व्हायाडक्टचा (उंच पूल, दरीवरून रेल्वे मार्गावरून जाणारा रस्ता) समावेश आहे. मोठमोठी दरी पार करून महामार्ग जाणार आहे. नाशिकमधील वशाळा येथील एका दरीवरून महामार्ग जाणार असून येथील पूलाचे खांब तब्बल ८४ मीटर अर्थात २७५ फूट इतके उंच आहेत. त्यामुळे हे आव्हानात्मक काम पूर्ण होण्यास डिसेंबरऐवजी आता मे २०२४ उजाडेल असे नुकतेच एमएसआरडीसीने जाहीर केले आहे. याच टप्प्यात कामादरम्यान आतापर्यंतचा सर्वात मोठा अपघात झाला आहे.
हेही वाचा >>>रेल्वेत जवानाकडून चौघांची हत्या; जयपूर-मुंबई एक्सप्रेसमधील थरार, आरोपी अटकेत
मागील वर्षी, एप्रिल २०२२ मध्ये नागपूर – शेलू बाजारदरम्यान उन्नत मार्गाचा भाग कोसळला. तर एप्रिल २०२२ मध्येच सिंदखेड राजा येथे टप्पा ७ मध्ये साखळी क्रमांक ३३२+६६५ वरील व्हायडकच्या ठिकाणी क्रेनच्या साहाय्याने पुलावर गर्डर बसविण्यात येत होते. क्रेनने गर्डर १० फूट उंच नेला असता क्रेनला लावलेले जॅक घसरले आणि गर्डर जमिनीवर कोसळला. ऑगस्ट २०२२ मध्ये वाशीम येथील मालेगावदरम्यान वाहन मार्गासाठीच्या उन्नत मार्गिकेच्या कामासाठी क्रेनच्या साहाय्याने गर्डर बसविण्यात येत असताना क्रेन चालकाकडून चूक झाली. त्यामुळे अचानक क्रेन कलंडली आणि गर्डर जमिनीवर कोसळले.
हेही वाचा >>>मुंबई विद्यापीठाकडून परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर; अतिवृष्टीमुळे २७ जुलैच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या
समृद्धी महामार्गाच्या कामादरम्यान सुरू असलेली दुर्घटनांची मालिका २०२३ मध्येही सुरूच आहे. मे २०२३ मध्ये शिर्डी – इगतपुरी या टप्प्यातील कामादरम्यान ही दुर्घटना घडली. घोटी – सिन्नरदरम्यान गांगडवाडी पुलाचे काम सुरू होते. या पुलासाठी बसविण्यात येत असलेले गर्डर क्रेनने वरती चढविण्यात येत होते. त्यावेळी क्रेनचा धक्का लागून गर्डर कोसळला. आतापर्यंतच्या चार अपघातांत कोणतीही जीवित हानी झाली नव्हती. सोमवारी सर्वात मोठा अपघात झाला आणि त्यात १७ जण ठार झाले.
हेही वाचा >>>राज्यपाल नामनिर्देशित १२ आमदारांचा वाद पुन्हा उच्च न्यायालयात; भूमिका स्पष्ट करण्याचे सरकारला न्यायालयाचे आदेश
चौथ्या टप्प्याअंतर्गत एका पुलाच्या कामासाठी गर्डर (तुळई) बसविण्याच्या कामाची तयारी सुरू होती. सिंगापूरवरून मागविण्यात आलेल्या अत्यानुधिक अशा लॉन्चरच्या मदतीने हे काम करण्यात येणार होते. या लॉन्चरला गर्डर अडकविण्यात आला होता. अचानक रात्री ११.३० च्या सुमारास लॉन्चर आणि गर्डर कोसळल्याची माहिती एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापाकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली. अपघात घडला तेव्हा तेथे २७ जण काम करीत होते. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची चौकशी करण्यात येणार आहे. गर्डर बसविण्याचे काम करणाऱ्या व्हीएसएल कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.