होळी उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून मुंबईस्थित कोकणवासीयांनी गावाची वाट धरायला सुरुवात केली आहे.  होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी एसटी महामंडळाने ३ ते १२ मार्चदरम्यान नियमित बससोबत २७० जादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता. या २७० बसगाड्यांतील आसने आरक्षित झाल्याची माहिती एस. टी. महामंडळातील अधिकाऱ्यांनी दिली.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मुंबई : परवान्याशिवाय अन्नपदार्थ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या आस्थापनेवर कारवाई

दरवर्षी कोकणामध्ये गणेशोत्सव, शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या उत्सवांच्या काळात मुंबईस्थित लाखो कोकणवासीय कोकणातील आपल्या गावी जातात. उत्सव काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होते. या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एस. टी. महामंडळाने यंदा होळीनिमित्त २७० जादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता. मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, बोरिवली, ठाणे, वसई, नालासोपारा, पनवेल येथील बस स्थानकांतून खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी, मालवण या भागात जादा बसगाड्या सोडण्यात येत आहेत. प्रवाशांनी ऑनलाइन पद्धतीने जादा बसमधील आसने आरक्षित केली आहेत. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या २७० जादा बस पूर्ण आरक्षित झाल्या आहेत, अशी माहिती एस. टी. महामंडळातील अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी एस.टी. बसमधून प्रवास करावा, असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Msrtc announes 2 special buses to konkan on holi occasion mumbai print news zws