मुंबई : दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाने सोडलेल्या जादा गाडय़ा, दहा टक्के भाडेवाढ आणि प्रवाशांनीही प्रवासासाठी निवडलेला एसटीचा पर्याय यांमुळे महामंडळाच्या तिजोरीत एकूण २१८ कोटी रुपये उत्पन्नाची भर पडली आहे. सर्वाधिक उत्पन्न हे धुळे विभागातून मिळाल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली.
दिवाळीला २२ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. त्यापूर्वीपासून एसटी महामंडळाने राज्यात नियमित गाडय़ांबरोबरच दररोज १,५०० जादा गाडय़ाही सोडल्या. या गाडय़ांचे मोठय़ा प्रमाणात आरक्षणही झाले. याच दरम्यान २१ ते ३१ ऑक्टोबपर्यंत १० टक्के भाडे आकारणी केली.
ही भाडेवाढ करूनही महामंडळाच्या गाडय़ांना प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. या काळात एसटी महामंडळाने प्रति किलो मीटर जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी प्रत्येक विभागाला दैनंदिन उद्दीष्ट दिले होते. त्यामुळे दिवाळीपूर्वी १३ कोटीच्या आसपास असलेले सरासरी दैनंदिन उत्पन्न दिवाळीमध्ये तब्बल २० कोटी रुपयांहून अधिक झाले. दिवाळीत ३१ आक्टोबरला सर्वाधिक म्हणजे २५ कोटी ४८ लाख उत्पन्न झाले. ३० ऑक्टोबरला २३ कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. मिळालेल्या प्रतिसादामुळे २१ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत एकूण ३ कोटी १८ लाख ६० हजार प्रवाशांनी प्रवास केला आणि यातून २१८ कोटी ३३ लाख रुपये उत्पन्न एसटी महामंडळाला मिळाले. त्यामध्ये धुळे विभागातून एसटीला ११ कोटी ४१ लाख, जळगाव विभागातून ११ कोटी ३२ लाख आणि कोल्हापूर विभागातून १० कोटी ६४ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे.
आर्थिक ओझे कमी करण्याच प्रयत्न
एसटी महामंडळाला राज्य शासनाकडून वेतनासाठी जरी निधी मिळत असला तरीही दैनंदिन खर्च, तसेच अन्य देणी ही दिवाळीत मिळालेल्या उत्पन्नातून देऊन आर्थिक ओझे कमी करण्याचा प्रयत्न असणार आहे.