मुंबई : गेल्या १५ दिवसांत राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) ३२८ कोटी ४० लाखांची कमाई केली आहे. दिवाळीच्या सुट्टय़ांमध्ये एसटी प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ नोंदविण्यात आली असून, हंगामी दरवाढीनंतरही प्रवाशांनी एसटीला पसंती दिल्याचे दिसते. करोनाचा प्रादुर्भाव आणि त्यानंतर एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी आंदोलनामुळे एसटीला मोठा आर्थिक फटका बसला होता.
हेही वाचा >>> महाराष्ट्रातच राहणार, लोकसभा लढवणार नाही! फडणवीस यांचा चर्चाना पूर्णविराम
काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काही ठिकाणी एसटी गाडय़ांची तोडफोड, जाळपोळ करून सेवा खंडित केली होती. त्यामुळे सुमारे १७ हजारांहून बस फेऱ्या बंद होत्या. मात्र, एसटी प्रशासनाने महसूल वाढीसाठी परिवर्तनशील हंगामी भाडेवाढ सूत्रानुसार यंदाच्या दिवाळीच्या हंगामात सर्व गाडय़ांच्या तिकीट दरात सरसकट १० टक्के भाडेवाढ होती. त्यानंतरही एसटी सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला.
१ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत एसटीला राज्यभरातून ३२८ कोटी ४० लाख रुपयांचा महसूल मिळाला. दिवाळीत बाहेरगावी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक होती. दिवाळीतील कमाईमुळे एसटीला मोठा दिलासा मिळाला आहे. भाऊबीजेला विक्रमी उत्पन्न बुधवारी भाऊबीजेच्या दिवशी एसटीला ३१ कोटी ६० लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षी २२ ऑक्टोबरला भाऊबीजेला एसटीला ३० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते, अशी माहिती एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.