गेल्या वर्षीच निर्णय
गेल्या वर्षी महामंडळाने घेतलेल्या एका निर्णयानुसार आता महामंडळ गर्दीच्या प्रत्येक हंगामात अशी दरवाढ करू शकते. त्यामुळे पुढील गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना कोकणात जाण्यास जादा दर आकारावे लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, खासगी वाहतूकदारांच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी राज्य परिवहन महामंडळालाही खासगी वाहतूकदारांच्या ‘दर’मार्गाने नेणारे परिवहन मंत्री एसटीचे दर कमी गर्दीच्या हंगामात कमी करणार का, असा संतप्त सवाल एसटी प्रवाशांनी केला आहे.

२००६च्या एका परिपत्रकानुसार एसटी महामंडळाला कमी गर्दीच्या हंगामात वातानुकूलित सेवांच्या दरांत ३३ टक्क्यांपर्यंत आणि साध्या व
निमआराम सेवांच्या दरांत १५ टक्क्यांपर्यंत घट करण्याचे अधिकार मिळाले होते. मात्र २०१४मध्ये केलेल्या एका ठरावामुळे महामंडळाला यात्रा, सण, उत्सव आणि गर्दीचा कालावधी यांदरम्यान अतिरिक्त भाडे आकारणीचे अधिकारही प्राप्त झाले.
या ठरावानुसार एसटी महामंडळ ही सार्वजनिक वाहतूक सेवा पुरवणारी संस्था नसून व्यावसायिक पद्धतीने चालवली जाणारी संस्था असल्याचेही अधोरेखित करण्यात आले होते.

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी हे अधिकार वापरून ऐन दिवाळीच्या काळात एसटीचे दर ५ ते २५ नोव्हेंबर या काळासाठी १० ते २० टक्के एवढे वाढवले आहेत. विशेष म्हणजे ही हंगामी दरवाढ पुढील वर्षी गणेशोत्सवादरम्यानही अशी दरवाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे त्या वेळी हंगामी दरवाढ करून एसटी महामंडळ अधिकाधिक नफा कमावण्याची शक्यता आहे.

प्रवासी संतापले
दिवाळीसारख्या गर्दीच्या हंगामात भाडेवाढ करून एसटीला नफेखोर खासगी वाहतूकदारांच्या पंक्तीत बसवणारे रावते त्याच वाहतूकदारांकडून धडा घेणार का, असा संतप्त सवाल प्रवासी करत आहेत. खासगी वाहतूकदार कमी गर्दीच्या हंगामात आपले दर ५० टक्क्यांपेक्षा खाली उतरवून सेवा देतात. परिवहनमंत्रीही एसटीचे तिकीट दर एवढे खाली उतरवणार का, असा प्रश्न मंगेश सानप या प्रवाशाने विचारला. तसेच, हे वाहतूकदार परतीच्या मार्गावरही कमी भाडे आकारतात. एसटी ही सवलत कधीपासून सुरू करणार, असा प्रश्न विद्या सोनावणे यांनी विचारला.

Story img Loader