‘आवडेल तिथे प्रवास’ या एसटीच्या योजनेतील चार आणि सात दिवसांच्या पासचे दर वाढवण्यात आले आहेत. गर्दीच्या आणि कमी गर्दीच्या अशा दोन्ही हंगामात प्रवाशांची पसंती असलेले हे पास आता पाच ते वीस रुपयांनी महागले आहेत. साधी, निमआराम आणि आंतरराज्य अशा तीनही प्रकारांत हे दर वाढवण्यात आले आहेत. हे नवीन दर आज, बुधवारपासूनच लागू होणार असून त्याआधी ज्यांनी हे पास काढले आहेत, त्यांच्याकडून कोणतीही वाढ वसूल करून घेतली जाणार नाही, असे एसटीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
एसटीच्या ‘आवडेल तिथे प्रवास’ या योजनेमार्फत चार दिवसांचा पास गर्दीच्या हंगामात म्हणजे १५ ऑक्टोबर ते १४ जून या दरम्यान साध्या गाडीसाठी पाच रुपये, हिरकणी आणि आंतरराज्य गाडीसाठी १० रुपये महागला आहे. तर सात दिवसांच्या पासाचे दर साध्या गाडीसाठी पाच रुपये, हिरकणी आणि आंतरराज्य गाडीसाठी १० रुपये एवढे महागले आहेत. कमी गर्दीच्या हंगामात सात दिवसांच्या पासचे दर साध्या गाडीसाठी दहा रुपये, हिरकणी गाडीसाठी १५ रुपये आणि आंतरराज्य गाडीसाठी २० रुपये जास्त आकारले जातील.
बस सेवा चार दिवस सात दिवस
जुने दर नवे दर जुने दर नवे दर
साधी ८०० ८०५ १४०० १४०५
हिरकणी ९२० ९३० १६०५ १६२५
आंतरराज्य ९९० १००० १७३० १७५०