‘कागदविरहीत कार्यालय’ ही संकल्पना पुढे ठेवून राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विकास खारगे एसटीच्या कारभारात अनेक बदल करत आहेत. याचाच एक भाग म्हणून आता एसटीचे विविध प्रकारचे पास स्मार्टकार्ड स्वरूपात मिळणार आहेत. अहिल्याबाई होळकर पास, विद्यार्थी पास, ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेचा पास, चार-सात दिवसांचे पास, मासिक व त्रमासिक पास हे सर्व पास आता स्मार्टकार्ड स्वरूपात मिळतील.
राज्यात एसटीचे एकूण ३० हजार पासधारक प्रवासी आहेत. या सर्व प्रवाशांना स्मार्ट कार्ड पासचा लाभ होणार आहे. सध्या ही स्मार्टकार्ड योजना विभागीय मुख्यालयांतील आगारांत सुरू झाली आहे. येत्या महिन्याभरात राज्यातील सर्वच आगारांत प्रवाशांना स्मार्टकार्डच्या रूपातील पास देण्यात येतील. हे स्मार्टकार्ड देण्याआधी प्रवाशाची जुजबी माहिती आगारात द्यावी लागणार आहे. प्रवास करताना वाहकाजवळील इटीआयएममध्ये या स्मार्टकार्डवरील माहिती नोंदवली जाईल. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेण्टीफिकेशन प्रणालीद्वारे हे स्मार्टकार्ड काम करणार आहे.
या प्रणालीमध्ये स्मार्टकार्डसाठी ‘सेक्युरिटी की’ असल्याने या स्मार्टकार्डचा गैरवापर करता येणार नाही. स्मार्टकार्डची मुदत संपल्यानंतर सहा महिन्यांच्या आत कार्डचे नुतनीकरण करणे आवश्यक आहे. तसेच हे स्मार्टकार्ड पाच वर्षांपर्यंत वापरता येणार आहे. या स्मार्टकार्डसाठी ३० रुपये शुल्क घेण्यात येणार असून पाच रुपये ओळखपत्रासाठी घेतले जातील. या स्मार्टकार्डमुळे वेळेची बचत होणार असल्याचे एसटीतर्फे सांगण्यात आले.

Story img Loader