पुणे येथे संतोष माने या मनोविकारग्रस्त चालकाने बेधुंद बस चालवून अनेकांचा बळी घेण्याच्या घटनेला एक वर्ष होत आले. मात्र या घटनेनंतर धडा घेत पुन्हा असे प्रकार होऊ नयेत यासाठी एस. टी. महामंडळाने नेमलेल्या समितीच्या सूचना अद्याप कागदावरच राहिल्या आहेत. समितीच्या सूचनांनुसार ज्या चालकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्यापैकी ज्यांना गंभीर स्वरूपाचे आजार आहेत त्यांना कोणतेही औषधोपचार न देताच पुन्हा कामाला जुंपण्यात आले आहे.
२५ जानेवारी २०१२ ला स्वारगेट आगारातून संतोष माने याने एसटी बस पळवून पुण्याच्या रस्त्यांवर मृत्यूचे जे तांडव घडविले त्यानंतर बस चालकांच्या मानसिक तणावाचा आणि बसेसच्या सुरक्षेचा अभ्यास करण्यासाठी उच्चस्तरीय तांत्रिक समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने चालकांची वैद्यकीय तपासणी, संरक्षक अडथळे, समुपदेशकांची नेमणूक, आणि आपत्कालीन परिस्थितीत वाहकसुद्धा बस थांबवू शकेल, असे बटन बसविण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या. पण या सूचनांपैकी समुपदेशकांची नियुक्ती सोडली तर अन्य कोणत्याही सूचनेची अंमलबजावणी झालेली नाही. चालकांची वैद्यकीय तपासणी दर तीन महिन्यांनी होणे अपेक्षित होते. पण सुरुवातीला एकदा झालेल्या वैद्यकीय तपासणीनंतर पुन्हा तपासणी झाली नसल्याचे समजते. त्यातही ज्या ३२ हजार चालकांची तपासणी करण्यात आली त्यातील बरेच चालक हे अतिमानसिक तणावाखाली आढळले होते. तर काहींना मोतीबिंदू झाल्याचे निदर्शनास आले होते. आणि बऱ्याच जणांना रक्तदाबाचा त्रास होता असे वैद्यकीय तपासात स्पष्ट झाले होते. परंतु नेहमीची तपासणी आणि इसीजी काढण्याव्यतिरिक्त प्रत्यक्ष उपचार करण्यात आला नसल्याचे चालकांनी सांगितले.
आत्तापर्यंत फक्त ११ आगारांतच संरक्षक अडथळे बसविण्यात आले आहेत. तसेच आपत्कालीन बटनाचा प्रयोगही अद्याप कागदावरच राहिला आहे. तांत्रिक समितीच्या वेळेवर बैठकाही होत नसल्याचे समितीतील सदस्य प्रमोद वानखेडे यांनी सांगितले. पण मनुष्यबळ कमी असल्याने या कामात काही अडचणी येत आहेत, असा खुलासा महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी केला.

Story img Loader