मुंबई: गेल्या दोन वर्षापासून राज्यात एसटीतील चालक कम वाहक पदासाठीची भरती प्रक्रिया रखडली आहे. प्रशिक्षण होऊनही काही जण एसटीत रुजू होऊ शकले नाहीत. मात्र आता हा प्रश्न मार्गी लागला असून एसटीतील २०१९ च्या भरती प्रक्रियेअंतर्गत चालक तथा वाहक पदाच्या भरतीतील पात्र उमेदवारांपैकी ४४८ जणांना नेमणूकीचे पत्र एसटी महामंडळाकडून देण्यात आले आहे. सर्वाधिक नेमणुका या जळगाव आणि धुळे जिल्ह्यात होणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> हास्यकलाकार, अभिनेता वीर दास विरोधात गुन्हा दाखल; स्वामित्त्व हक्क भंग केल्याचा निर्मात्याचा आरोप

एसटी महामंडळामध्ये २०१९ मध्ये चालक तथा वाहक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या भरती प्रक्रियेतील १,४३१ पात्र उमेदवारांना यापूर्वीच नेमणूक देण्यात आली आहे. मात्र, गेली दोन वर्षे कोरोनामुळे ही भरती प्रक्रिया थांबली होती. त्यानंतर रखडलेल्या उर्वरीत पात्र उमेदवारांच्या नेमणूकीला राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला.

चालक तथा वाहक पदाच्या ४ ऑक्टोबरला झालेल्या भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांपैकी २७ पुरूष उमेदवारांना नेमणुकीचे आणि २२ महिलांना  सेवापूर्व प्रशिक्षणाचे पत्र मंत्रालयात झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आले होते. त्यानंतर मुंबईत ३ नोव्हेंबरला आयोजित केलेल्या महासंकल्प रोजगार मेळाव्यानिमित्त २०१९ च्या रखडलेल्या भरतीतील ४४८ जणांना एसटीत चालक कम वाहक पदासाठी नियुक्ती पत्र देण्यात आली. यामध्ये धुळे जिल्ह्यातून १२५, जळगाव जिल्ह्यात १२४, नागपूर जिल्ह्यात ८०, भंडारा ४७,परभणी जिल्ह्यात ४५ यासह नाशिक, जालना, बुलढाणा जिल्ह्यातही ही पदे भरण्यात आली आहेत.

हेही वाचा >>> अब्दुल सत्तार यांच्या निवासस्थानावरील आंदोलनाप्रकरणी १८ जणांविरोधात गुन्हा; कफ परेड पोलिसांची कारवाई

एसटी महामंडळाने राबवलेल्या भरती प्रक्रियेत चालक तथा वाहक पदासाठी महिलांकडूनही अर्ज मागविले होते. यामध्ये २०३ महिला उमेदवार लेखी परिक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्या असून यापूर्वीच १४२ महिला उमेदवारांनी अवजड वाहन चालविण्याचा परवाना सादर केला आहे. यापैकी २२ महिला उमेदवारांना सेवापूर्व प्रक्षिणाचे पत्रही देण्यात आले आहे. रोजगार मेळाव्यानिमित्त रखडलेल्या भरती प्रक्रियेतील एसटीत नऊ वाहतुक निरीक्षक, पाच लिपिक- टंकलेखक, सहा सहाय्यक-शिपाई-सफाई कामगार, दोन लेखकार आणि एक विभागीय सांख्यिकी अधिकारी यांचीही नियुक्ती करण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Msrtc recruitment 2022 recruitment of 448 driver cum conductor in msrtc mumbai print news zws
Show comments