विकास महाडिक, लोकसत्ता
मुंबई : राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या महिला व ज्येष्ठ नागरिक या दोन्ही सवलत योजना राज्य परिवहन महामंडळाच्या पथ्यावर पडू लागल्या असून महामंडळाच्या तिजोरीत दरमहा भर पडत आहे. गेल्या वर्षी मे महिन्यापासून लागू करण्यात आलेल्या या योजनामुळे राज्यात एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली असून उत्पन्नात वाढ झाली आहे.
मे २०२२ मध्ये एसटीने ९ कोटी ५० लाख (प्रवाशांच्या ये-जा करण्यावर संख्या मोजली जाते) प्रवासी प्रवास करीत होते. सवलती दिल्याने ही संख्या १६ कोटी लाख झाली असून उत्पन्न ६०० कोटी ८२ लाखांवरून थेट ९१५ कोटी ८० लाख झाले आहे. विविध ३१ प्रकारच्या सवलतींसाठी राज्य सरकार महामंडळाला १४४९ लाख रुपये देणे लागत आहे. सरकारने एसटीला बळ देण्यासाठी १,१४४ कोटी रुपये अदा केले आहेत. त्यामुळे एसटीची आर्थिक घडी सुधारण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा >>> धनगर समाजाचा चिकित्सा अहवाल बासनात; महाधिवक्ता यांच्या अभिप्रायाविना अहवाल शासनाला परत
राज्यात एसटीचे मोठे जाळे विणले गेले आहे. राज्यातील प्रत्येक खेडय़ापर्यंत पोहोचणारे हक्काचे साधन म्हणून एसटीकडे पाहिले जात आहे. १५ हजार ९२२ सरकारच्या व ४६७ भाडेतत्त्वावर चालणाऱ्या एसटी दिवसाला ५० लाख किलोमीटर प्रवास करीत आहेत. या सेवेतून एसटीला दररोज २७ कोटी रुपये उत्पन्न मिळते. वर्षांला हे उत्पन्न ९ हजार ८५५ कोटी रुपयांच्या घरात जाते. मात्र ८७ हजार कर्मचारी व २५१ आगारांवर होणारा खर्च जवळपास तेवढाच असल्याने एसटी नेहमीच तोटय़ात असल्याचे चित्र आहे.
प्रवाशांच्या संख्येत वाढ
स्वातंत्र्यसैनिक, विद्यार्थी, अपंग यांच्यासह ३१ घटकांना एसटीच्या वतीने सवलतीच्या दरात तिकीट दर आकारला जात आहे. या तिकीट दरातील फरक हा शासनाच्या वतीने एसटी महामंडळाला अदा केला जात आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकारने गेल्या मे महिन्यात वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागिरकांना एसटी प्रवास मोफत करण्यात आला, तर महिलांसाठी महिला दिनापासून ही सवलत तिकीट दरात ५० टक्के देण्यात आली आहे. त्यामुळे महिला प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे