मुंबई : एसटी महामंडळाने विजेवरील पहिली शिवाई वातानुकूलित बस पुणे ते अहमदनगर मार्गावर चालवल्यानंतर आता पुणे ते औरंगाबाद मार्गावरही ही बस चालवण्यात येणार आहे. जुलैअखेरीस औरंगाबाद मार्गावरही शिवाई बस धावेल, अशी माहिती एसटी महामंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
प्रदूषणुक्त प्रवास, इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने विजेवरील बस चालवण्याचा निर्णय घेतला. अशा १५० बस महामंडळाच्या ताफ्यात टप्प्याटप्प्यात येणार असून पहिल्या टप्प्यात ५० बस आहेत. यातील पहिली वातानुकूलित शिवाई बस १ जूनपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. पुणे ते अहमदनगर ते पुणे मार्गावर ही बस धावत असून त्यासाठी या मार्गावरील निमआराम एसटीसारखेच २७० रुपये भाडे आकारले जात आहे. या सेवेला काहीसा चांगला प्रतिसादही मिळत आहे.
पुणे ते अहमदनगर ते पुणे मार्गावर सध्या दोन शिवाई आहेत. तर औरंगाबाद मार्गावरही
सुरुवातीला दोन शिवाई सुरू केल्या जातील. पुणे ते अहमदनगर आणि औरंगाबाद मार्गावर एकूण दहा शिवाई चालवण्याचे नियोजन महामंडळाने केले आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्यात पुणे ते कोल्हापूर, नाशिक, सोलापूर मार्गावरही या बस धावतील.
आषाढी यात्रेसाठी जादा बस
दरवर्षी एसटी महामंडळ आषाढी यात्रेसाठी जादा बस सोडतात. करोनाकाळातील निर्बंध व यात्राच नसल्याने महामंडळानेही जादा बस उपलब्ध केल्या नव्हत्या. यंदा १० जुलैला आषाढी एकादशी येत असून त्याआधी पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सुमारे चार हजारांच्या आत एसटीच्या जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे. मुंबईबरोबरच, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अमरावती आदी विभागांतून जादा बस सोडल्या जातील. त्यानिमित्ताने १४ जूनला पंढरपूरमध्ये एसटी अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाची बैठकही होणार आहे.