क्षमतेच्या केवळ १० टक्केच प्रवाशांचा प्रतिसाद; नवे मार्ग शोधण्याचा प्रयत्न
सुशांत मोरे, मुंबई
अव्वाच्या सव्वा भाडे आणि गैरसोयीचे मार्ग इत्यादी कारणांमुळे एसटीच्या शिवशाही वातानुकूलित स्लीपर बसगाडय़ा दहा टक्क्य़ांहून कमी प्रवासी घेऊन धावत आहेत. मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या या बससेवेची प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे वाताहात झाली आहे. प्रवाशांना या सेवेकडे वळवण्यासाठी एसटी महामंडळाने प्रयत्न सुरू केले आहेत तरकाही मार्गाच्या अभ्यासाला सुरुवात केली आहे.
खासगी प्रवासी बस वाहतुकदारांशी स्पर्धा करण्याकरिता आणि उत्पन्न वाढविण्याकरिता एसटी महामंडळाने १५० शिवशाही वातानुकूलित स्लीपर बस सेवा सुरू केली. पहिली बस शिरपूर (धुळे) ते पुणे या मार्गावर धावली. सध्या ५० बस गाडय़ा चालवल्या जात आहेत. मात्र वातानुकूलित स्लीपर बस सुरू करताना निवडलेले प्रवाशांच्या गैरसोयीचे मार्ग आणि अव्वाच्या सव्वा भाडे यामुळे प्रवाशांनी या सेवेकडे पाठ फिरविली आहे. एसटीने या बस गाडय़ांसाठी मुंबई ते कोल्हापूर, जळगाव, परळी, अक्कलकोट, आंबेजोगाई, पुणे ते नांदेड, लातूर ते कोल्हापूर, औरंगाबाद ते मुंबई सेन्ट्रल यासह अन्य मार्ग निवडले. मात्र या मार्गावर एक हजार रूपयांपेक्षा जास्त प्रवासी भाडे आहे. याच मार्गावर खासगी स्लीपर वातानुकूलित प्रवासी बसचे भाडे ५०० ते ७०० रुपयांपर्यंत आहे. तसेच वातानुकूलित आणि बिगर वातानुकूलित (सीटर) बसचे भाडे त्यापेक्षा कमी आकारले जाते. त्यामुळे एक हजार रूपये देण्यापेक्षा अनेक प्रवासी खासगी बसला पसंती देतात. त्याचा मोठा फटका एसटीच्या शिवशाही वातानुकूलित स्लीपर बस सेवेला बसतो आहे.
या बस गाडय़ांचे प्रवासी भारमान म्हणजे (वाहनाची प्रवासी क्षमता) दहा टक्क्यांच्या आतच आहे. या ३० आसनी बससाठी अवघे पाच ते दहा प्रवाशीच मिळतात. त्याचा आर्थिक फटका महामंडळाला बसत आहे. एका बसमागे किमान अकरा प्रवासी मिळाले तर ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर एसटी महामंडळ ही सेवा चालवू शकते.
मात्र महामंडळाला तेही जमत नाही. एसटीच्या वातानुकूलित स्लीपर बस गाडय़ांचे भाडे कमी करण्याचा प्रस्ताव तीन महिन्यांपूर्वी तयार करण्यात आला. तो प्रलंबित आहे. या बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना ३५ टक्के भाडे सवलत दिली जाते. पण हे प्रवासीही बसकडे फिरकत नसल्याचे चित्र आहे.
एसटीचे काही मार्ग आणि भाडे
एसटीचे मार्ग भाडे खासगी बसचे भाडे
मुंबई-कोल्हापूर १,०६० रु. ६०० रु.
मुंबई-अक्कलकोट १,२३५ रु. ६०० ते ७०० रु.
पुणे- नांदेड १,२५५ रु ७५० रु
लातूर-कोल्हापूर १,०१५ रु. ८०० रु.
औरंगाबाद-मुंबई सेन्ट्रल १,०६० रु. ७०० रु.
वातानुकूलित स्लीपर बस गाडय़ांचा प्रतिसाद वाढावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या बस गाडय़ांचे भाडे कमी करणे शक्य नाही. सध्या नवीन मार्गाबाबत अभ्यास सुरू आहे. लवकरच निर्णय घेऊ.
– रणजित सिंह देओल, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ