सुशांत मोरे, लोकसत्ता
मुंबई : राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) ज्येष्ठ नागरिक, समाजातील विविध घटकांना प्रवासभाडय़ात सवलत देण्यासाठी ‘स्मार्ट कार्ड’ योजना सुरू केली. मात्र महिनाभराहून अधिक कालावधीपासून राज्यातील नवीन स्मार्ट कार्ड नोंदणी, तसेच नूतनीकरणाचे काम ठप्प आहे. त्याचा लाखो सवलतधारकांना फटका बसला आहे. ‘स्मार्ट कार्ड’चे काम पाहणाऱ्या कंत्राटदाराची मुदत जून २०२२ मध्ये संपुष्टात आल्याने ही समस्या निर्माण झाली.
एसटीकडून १ जून २०१९ पासून सुरू स्मार्ट कार्ड योजना सुरू करण्यात आली. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, अंध व्यक्ती, स्वातंत्र्यसैनिक, अपंग आदींचा यामध्ये समावेश आहे. मात्र, जून २०२२ पासूनच हे काम पाहणाऱ्या कंत्राटदाराचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने राज्यातील स्मार्ट कार्डची सर्व कामे ठप्प झाली.
दरम्यान, या कंपनीत चार भागीदार असून त्यांच्याशी मुदतवाढीसंदर्भात चर्चा करण्यात येत आहे. लवकरच यावर तोडगा काढला जाईल, असे एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले.
ऑगस्टपर्यंत मुदतवाढ..
सध्या ३८ लाखांहून अधिक स्मार्ट कार्डसाठी एसटी महामंडळाकडे नोंदणी झाली असून यापैकी ३३ लाखांपेक्षा अधिक व्यक्तींना कार्डचे वाटप करण्यात आले आहे. सर्वाधिक नोंदणी ज्येष्ठ नागरिकांची (३४ लाख) समावेश आहे. तसेच ३० लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले आहे. चार लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी असून तीन लाख विद्यार्थ्यांना कार्डचे वाटप करण्यात आले आहे. या योजनेला ऑगस्ट २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.