इंधनावरील होणारा वाढीव खर्च कमी करण्यासाठी, वाढत्या प्रदूषणाला अटकाव करण्यासाठी एस.टी. महामंडळाने विद्युत बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १५० बस खरेदी करण्यात येणार आहेत. मार्च अखेरपर्यंत ७५ बस येणार आहेत. त्यापैकी ५० बस मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर धावणार आहेत.
हेही वाचा >>> राज्यातील १२ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई-पुणे महामार्गासह इतरही मार्गांवर विद्युत प्रभारणाची (चार्जिंग) सोय केली जाणार आहे. दुसऱ्या टप्यात, २०२४ मध्ये एसटीच्या ताफ्यात ५००० विद्युत बस विकत घेण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात एसटी प्रशासनाकडून शिवाई विद्युत बस धावणाऱ्या महामार्गावर विद्युत प्रभारण स्थानके सुरू करण्यात येणार आहेत. मार्च अखेरीस येणाऱ्या या बस प्राधान्याने विद्युत प्रभारण स्थानके असलेल्या ठिकाणी चालवण्यात येणार आहेत. सध्या बोरिवली, ठाणे, स्वारगेट, नाशिक, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर येथे बससाठी विद्युत प्रभारण स्थानके आहेत, अशी माहिती एस.टी. महामंडळातील अधिकाऱ्याने दिली.
हेही वाचा >>> मुंबई : तब्बल १८ लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा, १०० कोटी रुपये दंड वसूल
एस.टी. महामंडळाकडून १५० विदयुत बस आणण्याचा प्रस्ताव असून मार्च अखेरपर्यंत ७५ विदयुत बस येणार आहेत. पुण्यावरून या बस चालवण्यात येणार आहेत. पुणे – मुंबई, पुणे – ठाणे, नगर, औरंगाबाद, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर दरम्यान विद्युत बसच्या फेऱ्या होणार आहेत. – शेखर चन्ने, उपाध्यक्ष व व्यवस्थाकीय संचालय, एस.टी. महामंडळ