मुंबई : एसटी महामंडळाच्या ताफ्यात विजेवर धावणाऱ्या वातानुकूलित दोन हजार बस दाखल होणार आहेत. यापैकी सुमारे ९०० मिडी बस वातानुकूलित असल्याची माहिती महामंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महामंडळाच्या संचालक मंडळाची उद्या, शुक्रवार बैठक होणार आहे. या वेळी नवीन सीएनजी वाहनांऐवजी दोन हजार डिझेलवर धावणाऱ्या आणि दोन हजार विजेवर धावणाऱ्या बस घेण्याचा प्रस्ताव बैठकीत मांडला जाणार असून त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. मंजुरी मिळाल्यास लवकरच मिडी बसही प्रवाशांच्या सेवेत येतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवीन बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. मिडी  बस शहर ते ग्रामीण भागात चालवतानाच काही बस फक्त ग्रामीण भागातील प्रवाशांसाठीच चालवण्याचे नियोजन आहे. तिचे भाडे प्रवाशांना परवडणारे असेल, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. या बस १२ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. वातानुकूलित मिडी बसची प्रवासी क्षमता ३२ आसनी आहे.

विजेवरील विनावातानुकूलित आणि वातानुकूलित बस भाडेतत्त्वावर घेतल्यास त्याच्या दरात फारसा फरक नाही. त्यामुळे भाडेतत्त्वावर वातानुकूलित बस घेण्यावरच शिक्कामोर्तब करण्यात आले. सध्या महामंडळाकडे मिनी बस असून तांत्रिक बिघाड आणि अन्य काही समस्यांमुळे त्यांची संख्या गेल्या काही वर्षांत कमी करण्यात आली आहे.

३४ टक्के महागाई भत्त्याची प्रतीक्षा

मुंबई : राज्यातील एसटीचे कर्मचारी ३४ टक्के महागाई भत्त्यापासून अद्यापही वंचित राहिले आहेत. हा महागाई भत्ता मिळावा, यासाठीचा प्रस्ताव गेले दोन महिने राज्य शासनाकड आहे. त्यावर अद्यापही निर्णय घेण्यात आला नाही. किमान नोव्हेंबरच्या वेतनात हा भत्ता मिळावा, अशी मागणी आहे. एसटी महामंडळ तोटय़ात असल्याने राज्य सरकारकडून येणाऱ्या निधीतून एसटी कर्मचाऱ्यांना वेतन अदा केले जात आहे. गेल्या दोन महिन्यांत वेतन मिळण्यास उशीर झाल्याने या वेळी बोनसही मिळेल की नाही अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र तो देण्यात आला.

आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना..

नाशिक महानगरपालिकेला नाशिक शहर बस वाहतूक सुरू करण्याकरिता नाशिक येथील एसटी आस्थापना आणि मोकळी जागा भाडेतत्त्वावर देणे, एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्याबाबत उपाययोजना सुचविण्यासाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या कामकाजासाठी तज्ज्ञ समिती म्हणून शासन नियुक्त प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करणे हे विषय एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चेस येणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Msrtc to get 2 thousand electric ac buses zws