यंदा होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने नियमित बससोबतच २५० जादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ३ मार्च ते १२ मार्चदरम्यान जादा गाड्यागाड्या कोकण परिसरात सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. दरम्यान, सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी एसटीच्या बसमधून प्रवास करावा, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
हेही वाचा >>> “तुमच्याकडे ५ नगरसेवक नाहीत, बैठकीला ५०० रुपये देऊन…”, नरेश म्हस्केंचा आदित्य ठाकरेंना टोला
विविध सणांचे निमित्त साधून मुंबईतून मोठ्या संख्येने नागरिक कोकणात जात असतात. त्यामुळे या सणांच्या काळात प्रवाशांची संख्या वाढते. होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले असून यंदा २५० जादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, बोरिवली, ठाणे, वसई, नालासोपारा, पनवेल येथील बसस्थानकांतून खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी, मालवण या भागात जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. आगाऊ आरक्षणासाठी एसटी महामंडळाच्या https://msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळासह महामंडळाच्या ॲपचा वापर करावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे,.