दरमहा वाढत जाणारे डिझेलचे दर, अपुरे प्रवासी, सरकारकडे शिल्लक असलेली थकबाकी यांमुळे दिवसेंदिवस खचत जाणाऱ्या एसटी महामंडळाला त्यांच्या सेवेत असलेली एकमेव वातानुकूलित शयनयान बससेवा (स्लीपर) यशस्वीपणे चालवण्यात अपयश आले आहे. गेली दोन वर्षे मुंबई-बंगळुरू या मार्गावर तोटय़ातच चालणाऱ्या या बसची चाके १६ ऑक्टोबरला एसटी महामंडळापुरती तरी फिरायची थांबणार आहेत. आवश्यक नियोजनाचा अभाव, कर्नाटकच्या तुलनेत महाराष्ट्र एसटीचा चढा दर, प्रवाशांना आकर्षित करण्यात आलेले अपयश अशा अनेक कारणांमुळे ही प्रतिष्ठित तरीही नुकसानीतील सेवा बंद करण्याची वेळ एसटीवर आली आहे.
ही गाडी एसटीने विकत न घेता खासगी सेवा पुरवठादाराकडून कंत्राटावर घेतली, तसेच प्रवासी मिळवण्यासाठी ठिकठिकाणी एजंटांची नेमणूकही केली. मात्र या सेवेला सुरुवातीपासूनच अत्यल्प प्रतिसाद लाभत होता. सुरुवातीच्या पहिल्या महिन्यात एकदाही ही बसगाडी पूर्ण भरून बंगळुरूकडे रवाना झाली नाही की, मुंबईकडे आली नाही. दर फेरीला या बसमध्ये निम्म्यापेक्षा कमी प्रवासीच होते. सध्या ही सेवा मुंबई-कोल्हापूर मार्गावर सुरू आहे.

Story img Loader