* ५०० बसगाडय़ा भाडय़ाने घेणार * आराखडय़ासाठी विशेष स्पर्धा
राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे परिवहन मंत्री दिवाकर रावते आल्यानंतर आता एसटी महामंडळात ‘शिवशाही’ अवतरणार आहे. स्कॅनिया गाडय़ांना एसटीत प्रवेशबंदी झाल्यानंतर त्या तोडीच्या गाडय़ा एसटीच्या ताफ्यात दाखल करून घेण्यासाठी एसटीने ५०० गाडय़ा भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडय़ांना ‘शिवशाही’ असे नाव देण्यात येणार आहे. तसेच या गाडय़ांचा आराखडा, रंगसंगती आणि अंतर्गत रचना यांसाठी एसटी १० ते १६ डिसेंबर या दरम्यान स्पर्धा घेणार आहे. या स्पर्धेत सवरेत्कृष्ट ठरलेल्या तीन रेखाचित्रांना रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.
राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील ‘शिवनेरी’ ही सेवा प्रतिष्ठेची मानली जाते. मात्र सध्या महामंडळाच्या ताफ्यातील शिवनेरी गाडय़ा जुन्या झाल्या असून नव्या स्कॅनिया कंपनीच्या गाडय़ा विकत घेण्याचा करार एसटीने तांत्रिक अडचणींमुळे रद्द केला होता. त्यानंतर आता एसटी ४५ आसनी वातानुकुलित गाडी आणि ३० आसनी शयनयान वातानुकुलित गाडी सेवेत आणण्याच्या विचारात आहे. अशा प्रकारच्या ५०० गाडय़ा एसटी भाडेतत्त्वावर घेणार असून या नव्या गाडय़ांचे नामकरण ‘शिवशाही’ असे करण्यात आले आहे.
या गाडय़ा भाडेतत्त्वावर घेण्याआधी एसटीने या गाडय़ांची संरचना, आराखडा, अंतर्गत सजावट आणि रंगसंगती यांच्यासाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा १० डिसेंबरपासून सुरू होणार असून इच्छुक स्पर्धक १६ डिसेंबपर्यंत आपली रेखाचित्रे एसटीच्या ई-मेल आयडीवर पाठवू शकतात. srtccolourscheme@gmail.com या ईमेल-आयडीवर ‘kShivshahil असा विषय टाकून स्पर्धकांनी रेखाचित्रे पाठवायची आहेत. या रेखाचित्रांमधील रंगसंगतीचा विचार करून या गाडय़ा भाडय़ाने घेणार असल्याचे महामंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले. सवरेत्कृष्ट रेखाचित्राला पाच लाख, द्वितीय रेखाचित्राला तीन लाख आणि तृतीय क्रमांकाच्या रेखाचित्राला दोन लाख रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा