वर्षांच्या सुरुवातीलाच कॅलेंडरमध्ये येणाऱ्या सुट्टय़ांच्या तारखा पाहायच्या. चार दिवसांची मोठी सुट्टी मिळणार असे दिसले की त्याप्रमाणे आधीच नियोजन करून मोकळे व्हायचे ही पद्धतच जणू कालबाह्य़ झाली असल्याचा अनुभव ‘महाराष्ट्र पर्यटन महामंडळा’च्या  (एमटीडीसी) अधिकाऱ्यांना येतो आहे. प्रत्येक आठवडय़ाअखेरीस येणाऱ्या दोन सुट्टय़ांमध्ये मराठी माणूस फि रायला घराबाहेर पडतोच. त्यामुळे सध्या कुठल्याही मोसमातली, कुठल्याही महिन्यातली शनिवार-रविवारची सुट्टी आणि दोन दिवसांच्या सुट्टीतही ‘एमटीडीसी’च्या रिसॉर्ट्सना गर्दी असते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
यंदा स्वातंत्र्य दिन शनिवारी आला असल्याने नोकरदारांना रविवारला जोडून दोन दिवसांची सुट्टी मिळाली आहे. अशी छोटी सुट्टी असली तरी ती घरात बसून घालवण्याची कल्पना हल्ली कोणालाच पसंत पडत नाही. गेल्या वर्षी अनेक लोकांना मोठय़ा सुट्टय़ा मिळाल्या होत्या त्यामुळे आमच्या रिसॉर्ट्सना झालेली गर्दी अपेक्षित होती. मात्र, यावर्षी अनेक सण हे सुट्टीच्या दिवशीच आले असल्याने अगदी जेमतेम दोन दिवसांची सुट्टी लोकांना मिळते आहे. तरीही राज्यभरातले एमटीडीसीचे रिसॉर्ट्स आधीच आरक्षित झाले आहेत. महाबळेश्वर, माथेरान, माळशेज, कार्ला, भंडारदरा, चिखलदरा, मोझरी पॉइंट, वेळणेश्वर, गणपतीपुळे आणि शिर्डी येथील एमटीडीसीची सगळी रिसॉर्ट्स या मोसमासाठी शंभर टक्के आरक्षित झाली असल्याची माहिती एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन नानुटिया यांनी दिली.
‘या वर्षीचे कॅलेंडर पाहता लोकांना मोठय़ा कालावधीची सुट्टी मिळणे शक्य नाही असे दिसते. मात्र, तरीही अनेकांना केवळ गाडी चालवत मनमुराद भटकण्याची आवड असते, काहींना साहसी ठिकाणी फिरण्याची आवड असते. काहींना पर्वतराजी तर काहींना शांत नदीकाठचा परिसर भावतो. पर्यटकांच्या आवडीनुसार अनेक पर्याय आपल्याकडे राज्यभरात उपलब्ध आहेत. त्यामुळेच हल्ली छोटी सुट्टी असली तरी पर्यटक फिरायला बाहेर पडतात’, असे जैन यांनी सांगितले.
सध्या कोकणामध्ये भातलावणीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे काहींनी पर्यटनाचा वेगळा मार्ग निवडून शेतीपर्यटनाचा मार्ग निवडला आहे. तर, काही उत्साही युवकांनी जंगल भ्रमंती, किल्ल्यांवर भटकंती आणि बाइक सफारीचेही बेत आखले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा