वेतनाबाबत अद्याप आदेश नसल्याने कर्मचारी चिंतेत

‘महानगर टेलिफोन निगम’ कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा आता पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे. या कर्मचाऱ्यांचे यंदा एप्रिल महिन्याचे वेतन लांबण्याची चिन्हे आहेत. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दूरसंचार विभागाने हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले होते. तरीही एप्रिल महिन्याच्या वेतनाबाबत अद्याप कुठलेही आदेश न आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

टेलिफोन निगमच्या कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर महिन्याचे वेतन पहिल्यांदा लांबले होते. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने सर्वप्रथम दिले होते. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी व्यवस्थापनाने अडीचशे कोटी कर्जरूपाने उचलण्यासाठी जाहिरातही दिली होती, परंतु या जाहिरातीला एकाही बँकेने प्रतिसाद दिला नाही.

अखेरीस दूरसंचार विभागाने केलेल्या अर्थसाहाय्यामुळे या कर्मचाऱ्यांना विलंबाने वेतन मिळाले. फेब्रुवारी महिन्यापर्यंत या वेतनाचा घोळ सुरू होता. त्यातच व्यवस्थापनाने गुजरात पॅटर्ननुसार स्वेच्छानिवृत्ती योजनाही जारी करण्याचे ठरविले होते. ही योजनाही अद्याप आलेली नाही.

कर्मचाऱ्यांचे वेतन देता यावे यासाठी व्यवस्थापनाने दूरसंचारमंत्री मनोज सिन्हा यांना साकडे घातले. अखेरीस दूरसंचार विभागाने टेलिफोन निगमच्या व्यवस्थापनाला हजार कोटी रुपये दिल्यामुळे मार्च महिन्याचे वेतन वेळेवर मिळाले. आता एप्रिलच्या वेतनाचा पुन्हा तिढा निर्माण झाला आहे.