मोबाईलवरून व्हिडिओ कॉलसाठी थ्रीजी वा टूजी जोडणी बंधनकारक असून त्यासाठी मोजाव्या लागणाऱ्या शुल्काच्या तुलनेत प्रतिकॉल प्रतिमिनिट केवळ अडीच रुपये दराने एमटीएनएलने व्हिडिओ टेलिफोनी कार्यान्वित केली आहे. संगणक नसतानाही घरच्या फोनवरून आता व्हिडिओ टेलिफोनी करता येणार आहे. त्यासाठी विशिष्ट दूरध्वनी संच खरेदी करण्याबरोबरच नोंदणी करावी लागणार आहे. तूर्तास ही सेवा दिल्ली व मुंबईतील ग्राहकांनाच लागू होणार आहे.
या सेवेचे उद्घाटन गुरुवारी मुंबई आणि दिल्ली येथे एकाचवेळी झाले. मुंबईचे कार्यकारी संचालक पियुष अग्रवाल यांनी पहिला कॉल केंद्रीय दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांना केला आणि ही सेवा कार्यान्वित झाली. सध्या अस्तित्वात असलेल्या दूरध्वनी क्रमांकावरच ही सेवा घेता येणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी पूर्वी जादा खर्च येत होता. मात्र व्हिडिओ टेलिफोनीमुळे व्यावसायिक तसेच सरकारी कार्यालयांना फायदा होणार आहे, असा दावाही यावेळी करण्यात आला. यासाठी एचडी- व्हॉईस आणि व्हिडिओ फोन्स म्हणजेच व्हीफोन्स खरेदी करावे लागणार आहेत. मटेनिलीसोबत ही सेवा पुरविणारी साई इन्फोसिस्टम (इंडिया) लि. या कंपनीमार्फत हजार ते १२०० रुपयांच हे संच उपलब्ध होणार आहेत.
एकाच शहरात राहूनही नातेवाईक वा गावी राहणाऱ्या आई-वडिलांशी थेट बोलणे या सेवेमुळे शक्य होणार आहे. बीएसएनएल सेवाही यामध्ये सहभागी होणार असून त्याचा फायदा संपूर्ण देशभरात घेता येणार आहे. मटेनिलीने तूर्तास ६९९, ८९९ आणि १९९९ रुपयांचे तीन पॅकेज उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये अनुक्रमे प्रतिमहिना ७००, १००० मिनिटे आणि अमर्यादित व्हिडिओ कॉल्सची सुविधा उपलब्ध होणार आहे.

Story img Loader