निशांत सरवणकर, लोकसत्ता
मुंबई : गेली काही वर्षे ढासळलेली महानगर टेलिफोन निगम लि.ची (एमटीएनएल) सेवा सुधारण्याची चिन्हे दिसत नसून, गेल्या काही महिन्यांपासून मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतील दूरध्वनी व इंटरनेट सेवा ठप्प झाल्याचा अनुभव ग्राहक घेत आहेत. स्वेच्छानिवृत्तीमुळे अचानक निर्माण झालेल्या कर्मचारी तुटवडय़ावर उपाय म्हणून नेमण्यात आलेल्या कंत्राटी कामगारांची मुदतही संपल्यामुळे ही पाळी आल्याचा दावा व्यवस्थापनाकडून केला जात आहे. यामुळे कंटाळलेल्या ग्राहकांकडून सेवा बंद करण्याचा पर्याय निवडला जात आहे.
मुंबईपाठोपाठ सर्वात मोठा फटका नवी मुंबईतील ‘एमटीएनएल’च्या इंटरनेट आणि मोबाईल सेवेला बसला आहे. ‘एमटीएनएल’च्या मुंबईतील मुख्य नेटवर्कशी जोडण्यासाठी तुर्भे ते घाटकोपर आणि तुर्भे ते प्रभादेवी टेलिफोन एक्स्चेंज यादरम्यान फायबर केबलची अनुपलब्धता असल्याचे कारण पुढे केले जात आहे. दूरसंचार क्षेत्रातील एकेकाळी दादा कंपनी असणाऱ्या ‘एमटीएनएल’ची दुरवस्था झाल्याने त्याचा फटका बँका, सरकारी कार्यालये, टपाल कार्यालये, तसेच हजारो ग्राहकांना भोगावा लागत आहे. कुठल्याही दूरसंचार कंपनीसाठी फायबर केबल्स नेटवर्क महत्वाचे असते. पण, गेल्या काही वर्षांपासून ‘एमटीएनएल’ व्यवस्थापनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने ‘एमटीएनएल’च्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हेही वाचा >>> दसऱ्याच्या मुहूर्तावर सात नव्या नाटकांची घोषणा; नाटय़ निर्मात्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
मोठय़ा प्रमाणावर कर्मचारी-अधिकाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती दिल्यानंतर ‘एमटीएनएल’ला उतरती कळा लागली आहे. आवश्यकतेपेक्षा खूप कमी कर्मचारी-अधिकारी असल्याचे कारण पुढे करीत ‘एमटीएनएल’ व्यवस्थापनाने सेवा स्तर कंत्राट पद्धतीचा स्वीकार केला आहे. अशा पद्धतीने सुरुवातीला दोन वर्षांच्या कालावधीसाठी दिलेले आणि पुन्हा त्याच कंत्राटदाराला वर्षभराचा वाढीव कालावधी दिलेले कंत्राटही ३१ ऑगस्ट रोजी संपुष्टात आलेले असल्याने मनुष्यबळाअभावी ‘एमटीएनएल’चे कामकाज ठप्प झाले आहे. या निविदा प्रक्रियेत १७ कंत्राटदारांनी स्वारस्य दाखवले होते. त्यापैकी फक्त तीन कंत्राटदार अंतिम निकषात पात्र ठरले असले तरी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मागच्या दाराने कंत्राट पदरात पाडून घेतल्याची चर्चा होती. एमटीएनएलमध्ये पूर्वी फायबर केबल टाकण्याचे काम ज्याने केले त्याने स्वत:साठीही फायबर केबल्स टाकल्या व खासगी कंपन्यांना फायदा करून दिला. अशा डमी कंपन्यांच्या माध्यमातून कंत्राट देण्याचा अट्टहास ‘एमटीएनएल’च्या अंगलट आल्याचा दावा केला जात आहे. याबाबत ‘एमटीएनएल’चे कार्यकारी संचालक दीपक मुखर्जी तसेच विपणन व जनसंपर्क महाव्यवस्थापक एम. एल. मेघवाल यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. लघुसंदेशालाही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
स्थिती काय?
एमटीएनएल दिल्ली व मुंबई या दोन मुख्य शहरांत आपली सेवा पुरवते. एकेकाळी मुंबई एमएटीएनलमध्ये १४ विभाग होते. त्यापैकी आता केवळ पाच विभाग आहेत. एकेकाळी तब्बल १८ हजारांहून अधिक कर्मचारी-अधिकारी असलेल्या एमटीएनएलचा कारभार आता केवळ १२०० कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहेत. ‘टेलिफोन एक्स्चेंज, तिथे ग्राहक केंद्र’ असे धोरण राबवणाऱ्या एमटीएनएलमध्ये सध्या मुंबईत तीन तर नवी मुंबईत केवळ वाशी येथे ग्राहक केंद्र सुरु आहे.