मुंबई विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या एकूण ७०७ महाविद्यालयांपैकी ५००हून अधिक महाविद्यालये विद्यापीठाशी कायमस्वरूपी संलग्न नसल्याची माहिती मुंबई विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षक संघटना(मुक्ता)च्या माध्यमातून समोर आली आहे. विद्यापीठांची संलग्नता असल्याशिवाय अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिये’त (कॅप) महाविद्यालयांना सहभागी करून घेणार नसल्याचा निर्णय केंद्रीय तंत्रशिक्षण संचालनालयाने नुकताच जाहीर केला होता. त्यामुळे विद्यापीठाशी तात्पुरत्या स्वरूपात संलग्न असणाऱ्या किंवा संलग्नतेचा कालावधी उलटून गेलेल्या महाविदयालयातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात येऊ शकते.
‘मुक्ता’ या शिक्षक संघटनेने याप्रकरणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राज्यपाल के. शंकरनारायणन यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. मुंबईत तर काही महाविद्यालयांनी संलग्नतेच्या प्रक्रियेकरिता आवश्यक असलेले शुल्कही विद्यापीठाकडे जमा केले आहे. परंतु, विद्यापीठाने गेली चारपाच वर्षे ही महत्त्वाची प्रक्रियाच आपल्या कामाच्या यादीतून गुंडाळून टाकली होती. परिणामी विद्यापीठाची कोणत्याही प्रकारची संलग्नता नसताना संचालनालय त्यांचे प्रवेश करीत होते की जे नियमाबाह्य़ होते. मात्र, संचालनालयाच्या नव्या निर्णयानुसार अशाप्रकारच्या नियमबाह्य प्रवेशप्रक्रियेवर टाच येणार आहे.

Story img Loader