मुंबई विद्यापीठाच्या बहिशाल शिक्षण विभागाने या वर्षीपासून प्रा. डॉ. हसमुख धीरजलाल सांकालिया यांच्या जन्मदिनाचे निमित्त साधून १० डिसेंबर रोजी भारतीय पुरातत्व दिन साजरा करण्याचे ठरविले असून त्यानिमित्ताने संपूर्ण दिवसभराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
अशा प्रकारे पुरातत्व दिन साजरा करण्याची सुरुवात भारतात प्रथमच होत आहे. यात डॉ. सांकालियांचा गौरव करण्याबरोबरच पुरातत्वाबाबत उदासीन असलेल्या समाजात या विषयासंबंधाने जागृती करण्याचा हेतू आहे. विद्यानगरी, सांताक्रूझ पूर्व येथील आरोग्य केंद्राच्या इमारतीत बहिशाल शिक्षण विभागाचे कार्यालय आहे. तेथील आवारात होणारा हा कार्यक्रम सर्वासाठी विनामूल्य खुला असून सकाळी १०.३० ते सायं. ७ पर्यंत विविध कार्यक्रम यात सुरू असतील.
या कार्यक्रमाच्या आयोजनात बहिशाल शिक्षण विभागाशी सहकार्य करणारया संस्थांमध्ये इन्स्टुसेन ट्रस्ट, साठे महाविद्यालय या सहयोगी संस्थांबरोबरच डेक्कन महाविद्यालय, अंजनेरी येथील नाणकशास्त्र संशोधन संस्था, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे, म्यूझियम आर्ट कॉन्झर्वेशन सेंटर यांचा सहभाग आहे.
सकाळी साडेदहा वाजता मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळूकर आणि डेक्कन कॉलेज (अभिमत विद्यापीठ) ऑफ आíकऑलजीचे कुलगुरू डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन होईल. त्यानंतर वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची सुरुवात होईल.
यात पुरातत्व उत्खननाचा अनुभव घेण्यासाठी मॉक ट्रेन्च- लुटुपुटूचे उत्खनन, मातीच्या भांड्यांमधून उलगडणारा इतिहास, हरप्पन मुद्रा, प्रतिमा, मणी, नाणी, डोकरा धातूकाम, वारली चित्रकला, अश्म हत्यारे, जीवाश्म ओळख आणि संवर्धन यांविषयींचे स्टॉल्स, अनेक पोस्टर्स, छायाचित्रे, चांदोरे येथील विद्यापीठाच्या प्रयत्नांतून सुरू असलेल्या उत्खननाची चित्रफीत, प्राचीन लिपींमधील लेखन, साठे कॉलेज आणि इतर काही संग्राहकांकडील विविध पुरातत्वीय वस्तूंचे प्रदर्शन,  असे शैक्षणिक आणि रंजक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे.

Story img Loader