मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शहर आणि पूर्व उपनगरातील अनेक भागात गढूळ व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. भातसा जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या ३ ते ४ दिवसांत सातत्याने पाऊस पडत असून त्यामुळे नदीपात्रात गढूळ पाणी मिसळले आहे. महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये योग्य उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, त्याचबरोबर मुंबईकरांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

मुंबईतील पूर्व उपनगरे व शहर विभागातील काही भागात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. अनेक ठिकाणी पाण्याला दुर्गंधी येत आहे. मुंबईकरांना उत्तम नागरी सोयी सुविधा पुरविण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेकडे गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पाण्यासंदर्भातील तक्रारी प्राप्त होत आहेत. पूर्वीपासूनच मुंबई शहर व उपनगरातील अनेक भागात पाणीटंचाईने हैराण झालेले नागरिक आता गढूळ पाणीपुरवठ्याने त्रस्त झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून वडाळा, शीव, वांद्रे, कुर्ला, गोवंडी – मानखुर्द यांसह विविध भागात गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या ३ ते ४ दिवसांमध्ये भातसा जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने पाऊस झाला. नदीपात्रात गढूळ पाणी मिसळल्यामुळे मुंबईकरांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे, असा दावा महापालिकेने केला आहे. दरम्यान, गढूळपणा कमी करण्याची कार्यवाही जल अभियंता विभागाने हाती घेतली असून जलशुद्धीकरण केंद्रात योग्य उपाययोजना करण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना सात जलस्त्रोतांद्वारे दैनंदिन पाणीपुरवठा केला जातो. या जलस्त्रोतांपैकी भातसा जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात ३ ते ४ दिवसांत जोरदार पाऊस कोसळला आहे. परिणामी, नदीपात्रातून येणाऱ्या पाण्यामुळे गढूळपणा २१ ऑक्टोबरपासून वाढला आहे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : दिवाळीनिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी दादर-काजीपेट विशेष रेल्वेसेवा

जलशुद्धीकरण केंद्रांत योग्य उपाययोजना करण्यासह पाणी निर्जंतुक करण्यासाठी क्लोरीनचाही पुरेसा वापर करण्यात येत आहे. नागरिकांनी गढूळ पाणीपुरवठा झाल्यास घाबरून न जाता खबरदारीचा उपाय म्हणून पाणी गाळून व उकळून प्यावे, असेही आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.