मुंबई : सफाई कामगार म्हणून नोकरी देतो सांगून पालिकेच्या अंधेरीतील के/वेस्ट वार्डमधील मुकादम सतीश पिटया जाधव (५५) यांनी ३ लाखांची मागणी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी लाचेचा २० हजाराचा हफ्ता स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) त्यांना बुधवारी अटक केली .
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असून त्यांना कायमस्वरुपी नोकरीची आवश्यकता होती. त्यावेळी त्यांची ओळख जाधव यांच्याशी झाली. जाधवने १२ डिसेंबरला तक्रारदाराला पालिकेत कचरा उचलण्याच्या गाडीवर सफाई कामगार म्हणून नोकरी देतो असे सांगितले. तसेच सहा महिन्यात नोकरी कायमस्वरूपी होईल असे आमिष दाखवले. त्यासाठी कागदपत्रे तयार करण्यासाठी ५० हजार, नंतर अडीच लाख अशी एकूण ३ लाखांची मागणी केली.
हेही वाचा…सागरी किनारा मार्गाच्या कामाला प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नोटीस, सोमवारी सुनावणी
अखेर, तक्रारदार यांनी ३० डिसेंबरला एसीबीकडे धाव घेऊन तक्रार दिली. जाधवने तक्रारदार यांना अर्ज व कागदपत्रे घेऊन २ जानेवारीला येण्यास सांगितले. एसीबीच्या पडताळणीत आरोपीने कामासाठी ३ लाखांच्या लाचेची मागणी करून लाचेचा पहिला हप्ता म्हणून २० हजार रुपये रक्कम स्वीकारण्याचे कबूल केले. त्यानुसार, एसीबीने सापळा रचून २० हजारांचा हफ्ता स्वीकारताना जाधवला अटक केली. या प्रकरणी जाधवला ९ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.