मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत अपात्र धारावीकरांचे मुलुंडमध्ये पुनर्वसन करण्यास मुलुंडवासियांचा विरोध आहे. मात्र हा विरोध डावलून राज्य सरकारने नुकतीच मुलुंडमधील मिठागराची ५८.५ एकर जागा धारावीसाठी देली. त्यामुळे काही संतप्त मुलुंडवासियांनी मुलुंडमध्ये ठिकठिकाणी अनोखे फलक लावले आहेत. फलकावर नामांतर सोहळा आणि खाली मुलुंड नावावर काट मारत बाजूला नवीन धारावी असे लिहिण्यात आले आहे. मुलुंडचे नामांतर नवीन धारावी होण्याआधी जागे व्हा आणि अदानीविरोधातील आंदोलन तीव्र करा, असे आवाहन मुलुंडवासियांना करण्याचा प्रयत्न या फलकाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. हे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

राज्य सरकराने अपात्र धारावीकरांना धारावीबाहेर घरे देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी मुलुंड, कुर्ल्यासह अन्य काही ठिकाणची जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या (डीआरपी) माध्यमातून नवभारत मेगा डेव्हल्पर्स प्रायव्हेट लिमिटेडला (एनएमडीपीएल) दिली जाणार आहे. दरम्यान, अपात्र धारावीकरांचे मुलुंडमध्ये पुनर्वसन करण्यास मुलुंडवासियांचा तीव्र विरोध आहे. यासाठी जनआंदोलन करण्यात आले होते. मात्र मुलुंडवासियांचा विरोधाला डावलून मुलुंड येथील केळकर महाविद्यालयालगतची मिठागराची ५८.५ एकर जागा केवळ ३१९ कोटी रुपयांत एनएमडीपीएलला नुकतीच देण्यात आली. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे जनआंदोलनातील सदस्य संतप्त झाले आहेत. सरकार मुलुंडकरांचा विश्वासघात करीत असल्याचा आरोप करीत आता मुलुंडमधील जागा धारावीसाठी देण्याच्या निर्णयाविरोधातील आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. मुलुंडमधील जागा अदानीला आंदण देऊन मुलुंडचे नवीन धारावी करण्याचा घाट घातला गेल्यानंतरही मुलुंडकर मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत नसल्याने जनआंदोलनातील संतप्त मुलुंडवासियांनी मुलुंडमध्ये अनोखे फलक लावले आहेत.

मुलुंडमध्ये ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या फलकावर नामांतर सोहळा आणि त्याखाली मुलुंड नावावर काट मारत बाजूला नवीन धारावी असे लिहिण्यात आले आहे. तर त्याखाली शुभहस्ते, नाकर्ते राज्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी असेही नमुद करण्यात आले असून त्याखालोखाल उपस्थिती म्हणून झोपलेले मुलुंडकर, मुलुंडकर शब्दावर काट आणि पुढे न्यू धारावीकर असे लिहिण्यात आले आहे. तर शेवटी वेळ, लवकरच असे लिहिले गेले आहे. हे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. मुलुंडचे नवीन धारावी होण्याआधी जागे व्हा आणि अदानीविरोधातील आंदोलनात मोठ्या संख्येने सामील होऊन राज्य सरकारचा डाव हाणून पाडा, असे आवाहन या फलकाद्वारे करण्यात आल्याची माहिती ॲड. सागर देवरे यांनी दिली. कोणत्याही परिस्थितीत मुलुंडचे नवीन धारावी होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mulund will renamed new dharavi soon mulund residents agitated through boards mumbai print news asj