गेल्या महिन्याभरात कोस्टल रोड अर्थात सागरी किनारा मार्गाच्या उद्घाटनानं मुंबईकरांना दोन वेळा हुलकावणी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवजयंतीच्या दिवशी मुंबईत आले असताना त्यावेळी कोस्टल रोडचं उद्घाटन होईल असं बोललं जात होतं. मात्र, काही कारणास्तव ते होऊ शकलं नाही. त्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी यवतमाळमध्ये मोदी आले असताना ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या हस्ते हे उद्घाटन होईल असं बोललं जात होतं. पण तेही घडू शकलं नाही. आता मात्र मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब समोर आली असून कोस्टल रोडच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला आहे!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री एकनाथ शिदे, पालकमंत्री दीपक केसरकर व मंगल प्रभात लोढा यांनी गुरुवारी कोस्टल रोडची पाहणी केली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये लवकरच कोस्टल रोडचं उद्घाटन होईल, असं म्हटलं होतं. पण नेमका दिवस त्यांनी सांगितला नव्हता. मात्र, इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, कोस्टल रोडच्या उद्घाटनासाठीचा मुहूर्त आता ठरला आहे. येत्या सोमवारी म्हणजेच ११ मार्च रोजी सकाळी ११ वाजता कोस्टर रोडचा पहिला टप्पा मुंबईकरांना वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

“कोस्टल रोडचा पहिला टप्पा मुंबईकरांना वाहतुकीसाठी सोमवारी खुला होणार आहे. सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते कोस्टल रोडचं उद्घाटन केलं जाणार आहे. त्यानंतर हा रस्ता त्याचदिवशी सामान्य मुंबईकरांना खुला होईल”, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

कोणत्या टप्प्याचं उद्घाटन होणार?

प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सी लिंकच्या दक्षिण टोकापर्यंतच्या टप्प्याचं बांधकाम पूर्ण झालं असून त्याचं उद्घाटन सोमवारी केलं जाणार आहे. कोस्टल रोडची एकूण लांबी १०.५८ किलोमीटर असून त्यापैकी ९ किलोमीटरचा मार्ग दक्षिण मुंबईत आहे. या रस्त्यासाठी मुंबईत दोन मोठे बोगदे खोदण्यात आले आहेत. मे २०२४ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumai coastal road to be inaugurated on mondya by cm eknath shinde pmw