मुंबई : वांद्रे – कुर्ला संकुल (बीकेसी) परिसरात सिमेंट मिक्सरने दिलेल्या जोरदार धडकेत १० वर्षीय विद्यार्थिनीचीचा मृत्यू झाला. या अपघातात तिचा सहा वर्षांचा भाऊही जखमी झाला आहे. दोन्ही भावंडांना शाळेतून ने-आण करण्याची जबाबदारी एका रिक्षाचालकावर सोपविण्यात आली होती. पण रिक्षाचालक त्यांना रिक्षाऐवजी दुचाकीवरून घरी आणत असताना हा अपघात झाला. याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी सिमेंट मिक्सर चालकासह रिक्षा चालकाविरोधातही निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.

बीकेसी परिसरात वास्तव्याला असलेली विद्यार्थिनी शिफा शेख (१०) ड्युरेलो कॉनव्हेंट गर्ल्स हायस्कुलमध्ये इयत्ता चौथीत शिकत होती. तिचा भाऊ उमर शेख (६) सेंट ट्रीझा शाळेत इयत्ता दुसरीत शिकत आहे. दोघांनाही शाळेत ने-आण करण्याची जबाबदारी कुटुंबियांनी जाफर पठाण या रिक्षाचालकावर सोपवली होती. आपल्या दुचाकी अपघात झाला असून त्यात शिफा आणि उमर गंभीर जखमी झाल्याचे पठाणने बुधवारी सायंकाळी मुलांच्या कुटुंबियांना कळविले. मुलांच्या अपघाताचे वृत्त समजताच शेख कुटुंबाने शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात धाव घेतली. तेथे पोहोचल्यावर शेख कुटुंबियांना शिफाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

बीकेसी रो येथील कुर्ला वाहिनीवरील प्लॅटिना जंक्शनवर बुधवारी सायंकाळी हा अपघात झाला. उजव्या बाजूने येणाऱ्या सिमेंट मिक्सरने पठाणच्या दुचाकीला धडक दिल्यामुळे दोन्ही मुले खाली कोसळली. शिफा सिमेंट मिक्सरच्या चाकाखाली आली. त्यात तिच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या अपघातात तिचा भाऊ उमर किरकोळ जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी शिफाचे वडील सोहेल शेख यांनी सिमेंट मिक्सर चालक व रिक्षाचालक पठाण या दोघांविरोधात तक्रार केली असून पोलिसांनी सिमेंट मिक्सर चालक अल्ताफ फारूख अहमद व रिक्षाचालक जाफर पठाण यांच्याविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. शिफाच्या कुटुंबियांनी मुलांना रिक्षातून ने-आण करण्याची जबाबदारी पठावर सोपवली होती. पण तो रिक्षाऐवजी दुचाकीवरून दोन्ही मुलांना घरी आणत असताना हा अपघात झाला. याबाबत कोणतीही पूर्वकल्पना पठाणने शिफाच्या कुटुंबियांना दिली नव्हती. त्यामुळे त्याच्याविरोधातही निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Story img Loader