मुंबई : जम्मू काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक ठिकाणांवरील सुरक्षा अधिक सक्षम करण्यात येत असून मुंबईकर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे स्थानके आणि परिसरातील १० हजार सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून प्रभावी देखरेख करण्यात येत आहे. मुंबईतील दैनंदिन प्रवासी आणि देश-विदेशातील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलीस सज्ज आहेत.
मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयांतर्गत मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील १३९ रेल्वे स्थानके आहेत. या मार्गावरून दिवसभरात लोकलच्या सुमारे ३,२०० लोकल फेऱ्या होतात. त्यातून दैनंदिन ७५ ते ८० लाख प्रवासी प्रवास करतात. यासह लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या शेकडो फेऱ्या होतात. हजारोंच्या संख्येने प्रवाशांचा प्रवास होतो. रेल्वे आयुक्तालयांतर्गत या सर्व रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे प्रवशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देखरेख केली जात आहे.
मध्य, पश्चिम रेल्वेवरील प्रत्येक रेल्वे स्थानकावर ताफा वाढविला आहे. प्रत्येक लोकलमध्ये श्वान पथके तपासणी करत आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट, मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे टर्मिनस, बोरिवली आणि मध्य रेल्वे स्थानकावरील सीएसएमटी, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण या स्थानकावर लांब पल्ल्यांच्या गाड्या थांबा घेत असल्याने तेथे अधिक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.
सर्व पोलीस ठाण्यांतर्गत पोलीस मित्र, शांतता समिती, प्रवाशांबरोबरच प्रवाशी संघटना तसेच कॅन्टीन, रेल्वे, सफाई कर्मचारी, हमाल, बुट पॉलिश वाले यांच्याशी वैयक्तिक संपर्क ठेवला जातो. त्यामुळे सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक माहितीबरोबरच कोणतीही संशयित व्यक्ती, गोष्ट, वस्तू असल्यास त्याची तत्काळ माहिती मिळते. प्रत्येक वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला किमान दोन तास क्षेत्रीय ठिकाणी उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
उपाय काय?
पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येक अधिकाऱ्याला किमान चार तास पेट्रोलिंग करणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे दैनंदिन प्रवाशांची अचानकपणे तपासणी करण्याची मोहीम सुरू असते. त्यात विशिष्ट कार्यपद्धती ठरवून देण्यात आली असून त्यानुसारच तपासणी करण्यात येते. तसेच लोकलमध्ये अचानक तपासणी म्हणजेच ‘मॅसिव्ह फ्लॅश चेकिंग’ करण्यात येते. त्यात एक अधिकारी व त्यांच्या सोबत तीन ते चार कर्मचारी असतात. चालू लोकलमध्ये प्रवाशांची आणि प्रवाशांसोबत असणाऱ्या सामानाची अचानकपणे तपासणी केली जाते. दैनंदिनरित्या घातपात तपासणी करण्यात येत असते. विविध पोलीस स्थानकाद्वारे या बाबींचे दैनंदिनरित्या आयुक्तालयातील ‘अंतर्गत व्हाट्सअप ग्रुप’मध्ये छायाचित्र प्रसारित करण्यात येतात. या छायाचित्रांचे नियंत्रण कक्षात एकत्रिकरण केले जाते. घातपात तपासणीबाबत मुंबई रेल्वे पोलीस सजग राहून कार्य करत आहे, असेही रेल्वे पोलीस आयुक्तालयाने कळविले आहे.