मुंबई : अकरावी प्रवेशाची ‘दुसरी विशेष प्रवेश यादी’ मंगळवार, १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. या यादीअंतर्गत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजल्यापासून १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहे. अकरावी प्रवेशासाठीच्या पहिल्या विशेष प्रवेश फेरीअखेर मुंबई महानगर क्षेत्रातील केंद्रीय प्रवेश प्रक्रिया आणि कोट्यातील जागांवर अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी जवळपास २ लाख २० हजार ८४४ (७५.३५ टक्के) विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तर सुमारे ७२ हजार २५७ विद्यार्थी अद्यापही प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. तर केंद्रीय प्रवेश प्रक्रिया आणि कोट्यातील प्रवेश मिळून १ लाख ८३ हजार ११ (४५.३१ टक्के) जागा रिक्त आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुसऱ्या विशेष प्रवेश फेरीसाठी ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजल्यापासून १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत नवीन विद्यार्थी ऑनलाईन नोंदणी करून वैयक्तिक माहिती अर्जाचा भाग १ भरू शकतात आणि महाविद्यालय पसंतीक्रम असणारा अर्जाचा भाग २ भरता येणार आहे. याच कालावधीत संस्थात्मक, अल्पसंख्यांक आणि व्यवस्थापन या कोटांतर्गत प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना लॉगिनद्वारे अर्ज भरून ऑनलाईन पसंती नोंदविता येईल. त्यानंतर कोटांतर्गत विद्यार्थ्यांची प्रवेश यादी १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजल्यापासून १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत कोटांतर्गत प्रवेश निश्चित केले जाणार आहेत.

हेही वाचा: वेळेत उपचार न मिळाल्याने सेंट जॉर्जेस रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा मृत्यू; डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

दुसऱ्या विशेष फेरीसोबत द्विलक्षी प्रवेश फेरी – २ राबविण्यात येणार आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांना लॉगिनद्वारे द्विलक्षी प्रवेशासाठी ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजल्यापासून १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाईन पसंती नोंदविता येणार आहे. तसेच, प्रवेश अर्ज लॉक करणे बंधनकारक असेल. तसेच, यापूर्वीच्या कोणत्याही प्रवेश फेरीतून प्रवेश घेतलेले विद्यार्थी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयातील उपलब्ध द्विलक्षी विषय प्रवेशासाठी अर्ज करण्यास पात्र असतील. त्यानंतर, ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजल्यापासून १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत द्विलक्षी विषयासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची दुसरी प्रवेश यादी कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर जाहीर होईल. विद्यार्थ्यांना १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजल्यापासून १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पात्र ठरलेल्या विषयासाठी आपला प्रवेश निश्चित करता येईल.

पहिल्या विशेष फेरीनंतर प्रवेश प्रक्रियेची स्थिती

फेरी, कोटा – उपलब्ध जागा – प्रवेश घेतलेले विद्यार्थी – रिक्त जागा
केंद्रीय प्रवेश – २ लाख ३० हजार ५४६ – १ लाख ७० हजार ८४८ – १ लाख १२ हजार ९११
संस्थात्मक प्रवेश – २६ हजार ३५९ – ९ हजार २३ – ९ हजार ९०८

हेही वाचा: CM Eknath Shinde : ‘रस्ते दुरुस्तीच्या कामात हयगय नको’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अधिकऱ्यांना सूचना

अल्पसंख्यांक कोटा – १ लाख ७ हजार ६४० – ३५ हजार ११९ – २८ हजार २०
व्यवस्थापन कोटा – १८ हजार ७०२ – ५ हजार ८९४ – ११ हजार ५२४

एकूण – ३ लाख ८३ हजार २४७ – २ लाख २० हजार ८८४ – १ लाख ६२ हजार ३६३

७ हजार ९८५ विद्यार्थ्यांची पहिल्या पसंतीक्रमाच्या महाविद्यालयाकडे पाठ

पहिल्या विशेष फेरीअंतर्गत केंद्रीय प्रवेशाच्या उपलब्ध २ लाख २ हजार ४४१ जागांसाठी १ लाख ३ हजार १५४ विद्यार्थी पात्र होते. त्यापैकी ९० हजार ४०० विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय देण्यात आले. महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी ७० हजार ८८२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. तसेच, ६५ हजार ५०१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले. त्यापैकी ५७ हजार ३०० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. विविध कारणास्तव २९ विद्यार्थ्यांचे अर्ज नाकारण्यात आले आणि १८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले. तर ७ हजार ९८५ विद्यार्थ्यांनी पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश घेणे टाळले आहे. मात्र आता पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश घेणे टाळणाऱ्या विद्यार्थ्यांनाही विशेष फेरीत सहभागी होता येणार आहे. सुरुवातीच्या सर्व फेऱ्यांमध्ये प्रतिबंधित झालेले सर्व विद्यार्थी विशेष फेरीमध्ये सहभागी होऊ शकतात.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai 11th admission process second special admission list to be announce on 13th august mumbai print news css
Show comments