मुंबई : गोरेगावमधील सिद्धार्थ नगर अर्थात पत्राचाळ पुनर्विकासांतर्गत म्हाडाच्या मुंबई मंडळाला मिळालेल्या नऊ भूखंडांवर गृहनिर्मिती करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यानुसार आजवर चार भूखंडांवर २,३९८ घरे बांधण्याच्या कामाला लवकरच सुरुवात होईल. त्यातच आता मंडळाने सर्वसामान्यांसाठी पत्राचाळीत आणखी १,४५६ घरे बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आर-७/ए १ आणि आर -१२ ए या दोन भूखंडावर ही गृहनर्मितीसाठीचा प्रस्ताव नुकताच मंडळाने प्रशासकीय मान्यतेसाठी म्हाडा उपाध्यक्षांकडे पाठविला आहे. त्यांची मान्यता मिळाल्यानंतर हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविला जाईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वादग्रस्त पत्राचाळ प्रकल्प मंडळाकडे आल्यानंतर पुनर्वसन इमारतीचे व म्हाडाच्या हिश्श्यातील २०१६ च्या सोडतीतील घरांचा समावेश असलेल्या इमारतींचे बांधकाम मंडळाने पूर्ण केले आहे. लवकरच ६७२ मूळ भाडेकरूंसह ३०५ विजेत्यांना घरांचा ताबा दिला जाईल. दरम्यान पत्राचाळ अभिन्यासात ११ भूखंडापैकी सात मोकळे भूखंड मंडळाला वापरासाठी उपलब्ध झाले आहेत. त्यानुसार या भूखंडावर अधिकाधिक गृहनिर्मिती करून सर्वसामान्यांना मोठ्या संख्येने घरे उपलब्ध करुन देण्याची भूमिका म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी घेतली आहे.

हेही वाचा – पाणी नाही नळाला ? महापालिका कशाला ? गोरेगाववासियांचा पाण्यासाठी जनप्रक्षोभ मोर्चा

त्यानुसार याआधी आर-१, आर-७, आर-४ आणि आर-१३ या तीन भूखंडांवर २,३९८ घरे बांधण्यासाठी निविदा अंतिम करत पात्र कंत्राटदारांना कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. लवकरच या कंत्राटदारांकडून या घरांच्या कामाला सुरुवात होईल. अल्प, मध्यम आणि उच्च गटांसाठी ही घरे असून या घरांचे काम २०२८-२९ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. चार भूखंडावर घरे बांधण्याचा निर्णय घेतानाच आर-५ भूखंडावर २६ मजली व्यावसायिक इमारत बांधण्याचा निर्णय घेतला असून यासंबंधीची कार्यवाही सुरू आहे. पाच भूखंडांचा वापर निश्चित झाल्यानंतर आता उर्वरित दोन भूखंडांवर गृहनिर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती म्हाडातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

हेही वाचा – रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास : झोपु प्राधिकरणाकडून आतापर्यंत २५०० झोपड्या रिकाम्या

या प्रक्रियेसाठी दीड-दोन महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहेत. त्यामुळे फेब्रुवारी-मार्चमध्ये १४५६ घरांसाठी निविदा काढली जाईल असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

नंबरगेम

– १,१८१ घरे आर-७/ए १ या भूखंडावर

– ४४.०२ चौरस मीटर, ५९.०७ चौरस मीटर आणि ६७.७० चौरस मीटर इतक्या क्षेत्रफळाची घरे अल्प, मध्यम आणि उच्च गटासाठी

– ३५ मजली इमारतीत घरे, तर आर -१२ ए भूखंडावर

– २७५ घरे ३० मजली इमारतीत असून ती ४४.०२ चौरस मीटर आणि ६७.५३ चौरस मीटरची असतील.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai 1456 more houses of mhada for common people in patra chawl mumbai print news ssb