मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतल्या गोवंडीतल्या शिवाजी नगर भागात चार मित्रांनी एका बर्थ डे पार्टीनंतर तरुणाची हत्या केली. १८ वर्षीय साबिर अन्सारीने आपल्या मित्रांना १० हजार रुपये खर्चासाठी दिले होते. साबिरने आपल्या वाढदिवसासाठी पैसे जमा केले होते. साबिरने मित्रांकडे पैसे परत मागितले. मात्र मित्रांनी पैसे परत केले नाहीच पण साबिरची हत्या केली. या प्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी ज्यांना ताब्यात घेतलं आहे त्यापैकी दोघेजण अल्पवयीन आहेत.
साबिर त्याच्या कुटुंबासह बंगनवाडी भागात राहात होता. ३१ मे रोजी त्याचा वाढदिवस होता. आपल्या मित्रांना पार्टी देण्यासाठी त्याने १० हजार रुपये जमा केले होते. त्याच्या चार मित्रांना ही गोष्ट समजली. त्यानंतर या चारही मित्रांनी आम्हाला पार्टी दे असं सांगितलं. मात्र साबिरने पार्टी द्यायला नकार दिला. तसंच असंही सांगितलं की मी तुम्हाला वाढदिवसाची पार्टी देणार आहे त्यासाठी पैसे जमवले आहेत. जर मी आत्ता तुम्हाला पैसे दिले किंवा खर्च केले तर वाढदिवसाच्या पार्टीला पैसे राहणार नाहीत. मात्र त्याच्या चारही मित्रांनी त्याला सांगितलं आत्ता आपण पार्टी करु आम्ही सगळे तुला वाढदिवसाच्या आधी पैसे देऊन टाकू. चारही मित्रांनी त्याला हे विश्वासाने सांगितल्याने साबिरने विश्वास ठेवला. त्यानंतर या सगळ्यांनी भिवंडी, मुंब्रा आणि माहिम या ठिकाणी जाऊन पार्टी केली.
या सगळ्या पार्ट्या झाल्यानंतर साबिरचा वाढदिवस जवळ येत होता. त्यावेळी त्याने आपल्या मित्रांना पैसे देण्यासाठी आठवण केली. मात्र या चौघांनीही साबिरला धमकावलं आणि पळवून लावलं. त्यानंतर साबिरने ३१ मे रोजी या चौघांना न सांगता एक डी जे पार्टी आयोजित केली होती.
साबिरच्या वाढदिवसाची पार्टी सुरु होती तेव्हाच त्या पार्टीत न बोलवलेले चार मित्र तिकडे आले. त्यांनी साबिरला मारहाण केली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर चाकूचे वार करुन त्याची हत्या केली.