मालेगाव येथे २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्यातील आणखी एक साक्षीदार गुरूवारी फितूर झाला. खटल्यातील प्रमुख आरोपी ले. कर्नल प्रसाद पुरोहितशी कौटुंबिक संबंध असलेल्या या लष्करी अधिकाऱ्याला सरकारी पक्षाच्या विनंतीनंतर विशेष न्यायालयाने फितूर घोषित केले. त्यामुळे खटल्यातील फितूर साक्षीदारांची संख्या २५ झाली आहे.

हेही वाचा – मुंबई : म्हाडा प्रतीक्षानगरमध्ये ५२८ घरे बांधणार ; चारपैकी एका इमारतीच्या बांधकामाला सुरुवात

राष्ट्रीय तपास यंत्रणा कायद्यांतर्गत (एनआयए) स्थापन विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. के. लाहोटी यांच्यासमोर लष्करी अधिकाऱ्यांची साक्ष गुरूवारी नोंदवण्यात आली. त्यावेळी त्याने आरोपीच्या पिंजऱ्यात बसलेल्या पुरोहितची ओळख पटवली. राज्याच्या दहशतवादविरोधी पथक (एटीएस) या प्रकरणी तपास करत असताना अधिकाऱ्यांनी आपली चौकशी केली, परंतु जबाब नोंदवला नाही असे न्यायालयाला सांगितले. त्याच्या या दाव्यानंतर सरकारी पक्षाने केलेल्या विनंतीनुसार न्यायालयाने त्याला फितूर जाहीर केले.

हेही वाचा – मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधान मोदींना पत्र; म्हणाले, “महाराष्ट्राच्या खासदारांनी…”

तपास यंत्रणेच्या दाव्यानुसार, एटीएसने या साक्षीदाराचा तीन पानांचा जबाब नोंदवला होता. त्यात त्याने पुरोहितच्या घरी अभिनव भारत संघटनेशी संबंधित कागदपत्रे पाहिल्याचा दावा केला होता. पुरोहित आणि अन्य माजी लष्करी अधिकाऱ्याला आपण ऑक्टोबर २००८ मध्ये पाचगणी येथे अभिनव भारतसाठी आयोजित केलेल्या शिबिराच्या ठिकाणी सोडल्याचा दावाही केला होता.