मुंबई : चारित्र्याच्या संशयावरून २३ वर्षीय महिलेच्या अंगावर तिच्या पतीने रॉकेल टाकून तिला पेटवून दिल्याचा प्रकार वांद्रे पूर्व परिसरात घडला आहे. त्यात महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी निर्मल नगर पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून आरोपी पतीला गुरूवारी अटक केली.सिमरन सलमान कुरेशी (२३) असे जखमी महिलेचे नाव आहे. त्या वांद्रे पूर्व येथील बेहरामपाडा परिसरातील लकडेवाला गल्ली येथे पतीसोबत राहतात. त्याचा पती सलमान इरशाद कुरेशी याचा कपडे विक्रीचा व्यवसाय आहे. २१ मार्चला महिला व पतीमध्ये घरात असताना त्यांच्या भांडण झाले. त्यातून संतापलेल्या सलमानने पत्नीला शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर त्याचा राग एवढा अनावर झाला की त्याने घरातील रॉकेल आणले आणि पत्नीच्या अंगावर ओतले. त्यानंतर माचिसच्या काडीने आग लावली.
महिला स्थिती गंभीर
आगीमुळे महिला गंभीर भाजली. तिला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. तिची अवस्था गंंभीर असल्यामुळे तिला तात्काळ कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. आगीमुळे महिला ४५ टक्के भाजली आहे. संपूर्ण अंगावर जखमा आहेत. उपचारादरम्यान मुलीची स्थिती थोडी स्थीर झाल्यानंतर तिला याबाबत विचारण्यात आले. अखेर तिची आई गौरी कुरेशी (४५) यांच्या जबाबानुसार हा प्रकार पतीने केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर निर्मल नगर पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानुसार निर्मल नगर पोलिसांनी गुरूवारी गौरी कुरेशी यांचा सविस्तर जबाब नोंदवून मुलीचा पती सलमान कुरेशी (३४) याच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी पतीला अटक
जखमी महिला व आरोपी पतीमध्ये नेहमी भांडणे होत होती. आरोपी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यामुळे व्यवसायावरून आल्यानंतर तिच्याशी वाद घालायचा. त्यांच्यात २१ मार्चलाही कडाक्याचे भांडण झाले. त्यात आरोपीने पीडित महिलेला शिवीगाळ व मारहाणही केली. त्यानंतर त्याने अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर निर्मल नगर पोलिसांनी रुग्णालयातून आरोपी सलमान कुरेशीला गुरूवारी अटक केली. त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०९, ७९, ११५ (२), ३५२ अंतर्गत हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा गुन्हेगारी पूर्व इतिहास तपासण्यात आला असून त्याच्याविरोधात यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सुरूवातीला याप्रकरणी ईपीआर दाखल करण्यात आला होता. पण तक्रारीनंतर आम्ही गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले