२६/११ च्या हल्ल्यानंतर गाजावाजा करीत स्थापन झालेल्या ‘नॅशनल सिक्युरिटी गार्ड’च्या (एनएसजी) मरोळ येथील संकुलातील एका इमारतीला उद्घाटनानंतर अवघ्या आठ महिन्यांतच भेगा पडल्याचे स्पष्ट झाले आहे. या इमारतीत राहणाऱ्या २४१ ‘ब्लॅक कॅट’ कमांडोंना याच संकुलातील तात्पुरत्या इमारतीत हलविण्यात आले आहे. या प्रकल्पाला सुरक्षिततेचे प्रमाणपत्र देणाऱ्या रुरकी आयआयटीचे तज्ज्ञ तात्काळ घटनास्थळी रवाना झाले आहेत.
‘फोर्स वन’ या दहशतवाद्यांशी दोन हात करण्यासाठी उभारण्यात आलेल्या राज्य पोलिसांच्या विशेष यंत्रणेला भूखंड मिळण्यास विलंब लागला. त्यानंतर त्यांचे संकुल बनविण्याचे काम प्रगतिपथावर असतानाच एनएसजीने फेब्रुवारी महिन्यात आपल्या सुसज्ज संकुलाची उभारणीही पूर्ण केली. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम यांच्या हस्ते या संकुलाचे उद्घाटन करण्यात आले. कमी वेळात संकुल उभारण्यात आल्याबद्दल संबंधितांचे तोंड भरून कौतुकही करण्यात आले होते. कमी वेळात संकुल उभारताना मजबुतीकरण आणि सुरक्षितता याबाबत कुठेही तडजोड करण्यात आलेली नाही, असेही त्या वेळी स्पष्ट करण्यात आले होते. इतकेच नव्हे तर संकुलात ज्या इमारती बांधण्यात आल्या आहेत, त्यांच्या सुरक्षितता आणि मजबुतीकरणाबाबत रुरकी आयआयटीने मंजुरी दिल्याचाही दावा करण्यात आला होता, परंतु त्यापैकीच एका इमारतीला भेगा पडल्याचे स्पष्ट झाले आहे. ही इमारत राहण्यायोग्य नसल्याचे स्पष्ट झाल्याने तेथे प्रशिक्षण घेणाऱ्या तसेच राहणाऱ्या कमांडोंना तूर्तास अन्यत्र हलविण्यात आले आहे. अंधेरी पूर्वेतील जोगेश्वरी-विक्रोळी लिंकिंग रोडवरील मरोळजवळ सुमारे २३ एकर भूखंडावर हे संकुल उभारण्यात आले आहे. २६/११ च्या हल्ल्यानंतर मुंबईत एनएसजीचे स्वतंत्र संकुल उभे केले जाईल, अशी घोषणा चिदम्बरम यांनी केली होती. राज्य शासनाने मरोळ येथील राज्य पोलिसांच्या मालकीच्या भूखंडातील २३ एकर जागा तात्काळ उपलब्धही करून दिली. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या संकुलाची उभारणी सुरू केली होती. तब्बल तीन वर्षांनंतर एनएसजीचे संकुल उभे राहिले. आता मात्र यापैकी एका इमारतीला भेगा पडल्याने या संकुलातील सर्वच इमारतींच्या मजबुतीकरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता वर्ष पूर्ण व्हायच्या आतच या संकुलातील सर्व इमारतींची पुन्हा तपासणी केली जाणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.   

Story img Loader