मुंबई – दक्षिण मुंबईतील कामाठीपुऱ्यातील सहा हजारांहून अधिक रहिवाशांना ५०० चौ. फुटांची घरे मिळणार आहेतच, पण त्याचवेळी आता ही घरे उत्तुंग अशा ५८ मजली इमारतीत असणार असल्याची माहिती समोर आली आहे. कामाठीपुरा पुनर्विकासाचा आराखडा म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून नुकताच राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.
या आराखड्यास मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामासाठी निविदा मागविल्या जाणार आहेत. या आराखड्यानुसार मूळ रहिवाशांसाठी येथे ५८ मजली तर विक्रीसाठी थेट ७८ मजली इमारती बांधल्या जाणार आहेत. दक्षिण मुंबईतील ७७,९४५.२९ चौ.मीटर जागेवर कामाठीपुरा वसलेले असून यात ४७५ उपकरप्राप्त इमारती असून उपकरप्राप्त नसलेल्या १६३ इमारतींसह पुनर्बांधणी करण्यात आलेल्या १५ इमारती तसेच पीएमजीपी इमारती आहेत. तर ५२ इमारती कोसळल्या असून येथे १५ धार्मिकस्थळे असून दोन शाळा, चार सरकारी कार्यालये आणि आठ इतर बांधकामे या सर्व इमारतींची दुरवस्था झाल्याने कामाठीपुऱ्याच्या पुनर्विकासाची जबाबदारी दुरुस्ती मंडळाकडे देण्यात आली आहे. त्यानुसार दुरुस्ती मंडळाने नुकताच पुनर्विकासाचा आराखडा पूर्ण केला आहे. प्रकल्पाच्या आराखड्यानुसार पात्र रहिवाशांना ५०० चौ. फुटांची घरे देण्यात येणार आहेत. ही घरे ५८ मजली इमारतीत असतील.
हेही वाचा – देवीचे चित्र असलेल्या नाण्याच्या नावाखाली वयोवृद्धाची लाखोंची फसवणूक
५८ मजली पुनर्वसित १० इमारती असणार असून त्यात अंदाजे ६ हजार रहिवाशांना सामावून घेतले जाणार आहे. नियुक्त विकासकाला विक्रीसाठी उपलब्ध होणाऱ्या इमारती या ७८ मजली असतील. अशा एकूण आठ इमारती तेथे बांधल्या जाणार असल्याची माहिती दुरुस्ती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. कामाठीपुरा पुनर्विकास आराखड्याला उच्चस्तरीय समितीची मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाची निविदा काढली जाणार असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले. मंगळवारी या पुनर्विकासाच्या कामाचा सविस्तर आढावा गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी घेतला. यावेळी पुनर्विकासाच्या कामाला वेग देण्याचे निर्देश त्यांनी म्हाडाला दिले.
हेही वाचा – मुंबई : सुमारे आठ कोटींच्या कर फसवणुकीप्रकरणी कंपनीसह दोघांविरोधात गुन्हा
…म्हाडाला अंदाजे ९५० घरे मिळणार
कामाठीपुरा पुनर्विकासाच्या माध्यमातून म्हाडाच्या दुरुस्ती मंडळाला ४४ हजार चौ. मीटर इतके क्षेत्रफळ म्हाडाचा हिस्सा म्हणून उपलब्ध होणार असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले. या ४४ हजार चौ. मीटर जागेवर ५०० चौ. फुटाची अंदाजे ९५० घरे म्हाडाला उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.