मुंबई : इलेक्ट्रीक वस्तूंची निर्मिती करणाऱ्या ६६ वर्षीय व्यावसायिकाला शेअर बाजारातील गुंतवणुकीचे आमिष दाखवून ५५ लाख रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शीव येथील रहिवासी व्यावसायिकाने याप्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे. याप्रकरणी मध्य प्रादेशिक सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून बँक व्यवहाराच्या माध्यमातून पोलीस तपास करीत आहेत.

तक्रारदारांचा चुनाभट्टी येथे इलेक्ट्रीक वस्तू बनविण्याचा कारखाना आहे. तक्रारदाराने डिसेंबर २०२४ मध्ये एक इंटरनेट लिंक उघडली होती. त्यावेळी त्यांना एका व्हॉट्स ॲप ग्रुपमध्ये सामिल करण्यात आले. या ग्रुपमध्ये शेअरसंदर्भातील दैनदिन माहिती दिली जात होती. ग्रुपमधील ॲडमिन सभासदांना शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा सल्ला देत होता. कुठल्या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास किती फायदा होईल, कोणते आयपीओ फायदेशीर आहेत, याबाबत माहिती मिळत असल्याने त्यांना शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत आकर्षण निर्माण झाले. त्यामुळे त्यांनी ॲडमिनशी चर्चा केली. त्यांना एक लिंक पाठवण्यात आली. त्यानंतर ते दुसऱ्या व्हॉट्स ॲप ग्रुपमध्ये सामिल झाले.

तक्रारदार व्यावसायिकाला त्या ग्रुपमध्ये लिंकद्वारे एक ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. त्या ॲपवर इंटरनॅशनल स्टॉक परफोर्मन्स येथे क्लिक केल्यानंतर त्याच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाल्याचे ॲप्लिकेशनवर दाखवण्यात आले. त्यानंतर आयपीवर क्लिक केले तर त्यांना मोठा फायदा होईल असे सांगून तक्रारदारांना २१ जानेवारी २०२५ रोजी दोन लाख रुपये देण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर त्यांना १० लाख रुपयांचा आयपीओ मिळाल्याचे दाखवण्यात आले. त्यामुळे तक्रारदारांना पुन्हा आठ लाख ३० हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. त्यावेळी त्यांच्या ॲप्लिकेशनमध्ये ११ लाख ७६ हजार रुपये असल्याचे दिसत होते. पुढे विविध फायद्याचे आमिष दाखवून तक्रारदारांना ५५ लाख ४१ हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले.

या गुंतवणुकीवर चांगला फायदा झाल्याचे त्यांना ॲपवर दिसत होते. मात्र त्यांच्या ॲपमधून रक्कम बँक खात्यात हस्तांतरित होत नव्हती. त्यामुळे त्यांनी ॲडमिनकडे विचारणा केली असता त्याने आणखी पैसे जमा केल्यानंतर ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित होईल असे सांगितले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी परिचित व्यक्तीला याबाबत सांगितले. यावेळी त्याने सायबर फसवणूक झाल्याचे सांगितले. तसेच त्याने सायबर पोलिसांकडे तक्रार करण्याचा सल्लाही दिला. त्यामुळे त्यांनी सायबर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित अज्ञात आरोपीविरोधात तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी दोन अनोळखी व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहिता व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्यातील कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा सायबर पोलीस तपास करीत आहेत.

१२०० कोटींच्या सायबर फसवणुकीच्या तक्रारी

मुंबईतील सायबर फसवणूकीच्या प्रमाणात २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मुंबईत नोव्हेंबर २०२३ पर्यंत केवळ २६२ कोटी रुपयांची सायबर फसवणूक झाली होती. २०२४ नोव्हेंबरमध्ये त्यात वाढ झाली आणि सायबर फसवणुकीतील रक्कम ११८१ कोटी रुपयांच्या घरात पोहोचली. २०२३ मध्ये याच कालावधीत या हेल्पलाईनला सुमारे ९१ हजार दूरध्वनी आले होते. त्यातही २०२४ मध्ये वाढ झाली. नोव्हेंबर २०२४ पर्यंत ५५ हजार ७०७ जणांनी सायबर फसवणूक झाल्याची तक्रार केली असून त्यात ११८१ कोटी रुपयांची सायबर फसवणूक झाली आहे. त्यातील केवळ १२ टक्के म्हणजे १३९ कोटी १५ लाख रुपये परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत १८ हजार २५६ जणांनी तक्रारी केल्या होत्या. त्याची २६२ कोटी ५१ लाख रुपयांची सायबर फसवणूक झाली होती. त्यातील केवळ १० टक्के म्हणजे २६ कोटी ५२ लाख रुपये परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे सायबर फसवणुकीतील रक्कम परत मिळण्याचे प्रमाणही फार कमी आहे.