इंद्रायणी नार्वेकर
मुंबईतील करोनास्थिती आटोक्यात येत असल्याचे दिसत असून मंगळवारी केवळ ७०० नव्या रुग्णांची नोंद झाली. चोवीस तासांतील बाधितांचा हा गेल्या १०० दिवसांतील सर्वात कमी आकडा आहे.
एकूण ८७७६ चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी केवळ ७१७ जण म्हणजेच ८.१७ टक्के जणांचे अहवाल बाधित आढळले. सध्या मुंबईत दिवसभरात जेवढय़ा चाचण्या केल्या जातात त्यापैकी बाधित असणाऱ्यांचे प्रमाण केवळ १५ ते २० टक्के इतके आहे. मे आणि जून महिन्यात हेच प्रमाण ४० ते ५० टक्के होते. शहरात जून महिन्यापर्यंत दिवसभरात सरासरी ४५०० चाचण्या केल्या जात होत्या. २२ जूननंतर मुंबईत प्रतिजन चाचण्या सुरू करण्यात आल्या. अध्र्या तासाच्या आत अहवाल देणाऱ्या या चाचण्यांचे प्रमाण वाढवल्यामुळे दर दिवशी साडेसहा हजार चाचण्या केल्या जाऊ लागल्या. सुरुवातीच्या काळात केवळ तीन परिमंडळांमध्ये प्रतिजन चाचण्या केल्या जात होत्या. त्यांचे प्रमाण संपूर्ण शहरात वाढवण्यात आले असून सध्या दररोज साडेसहा ते साडेआठ हजार चाचण्या केल्या जात आहेत. या चाचण्यांची संख्या १२ हजारांपर्यंत नेण्याचे उद्दिष्टही पालिका प्रशासनाने ठेवले आहे.
दिवसभरात केल्या जाणाऱ्या या चाचण्यांमध्ये काही दुबार चाचण्यांचाही समावेश असून साधारण ४ टक्के चाचण्या या मुंबईबाहेरील रुग्णांच्याही आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
२२ मे रोजी चाचण्यांच्या तुलनेत ५४ टक्के अहवाल बाधित आले होते. हा सर्वात मोठा आकडा होता. या दिवशी ३२०९ चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी १७४२ म्हणजेच ५४.२८ टक्के अहवाल बाधित आले होते.