मुंबईः कांजूरमार्ग येथील ४२ वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात टणक वस्तू मारून त्याचा खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून वैद्यकीय अहवालानंतर पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला. ४२ वर्षीय मृत व्यक्तीची ओळख पटली असून त्याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजेश मनबीरसिंह सारवण (४२) अशी मृत व्यक्तीची ओळख पटली आहे. ते चकाला रोड परिसरातील वाल्मिकी रहिवासी संघ येथील रहिवासी होते. कांजूरमार्ग मेट्रो कारशेड परिसरात रविवारी राजेश यांचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन राजावाडी रुग्णालयात मृतदेह नेला होता. त्याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली होती. शवविच्छेदन अहवालात मृत व्यक्तीच्या डोक्यावर टणक वस्तूने प्रहार करण्यात आल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. अखेर याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी स्वतः याप्रकरणी तक्रार दाखल केली असून आरोपीचा शोध सुरू आहे.

हेही वाचा – आरोपीला सैफच्या घरी नेऊन तपास

हेही वाचा – भांडुपमधील ड्रीम मॉलमध्ये आढळला महिलेचा मृतदेह

पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात रविवारी दुपारी दूरध्वनी आला होता. एक व्यक्ती कारशेड परिसरात जखमी अवस्थेत पडली असल्याचे कांजूरमार्ग पोलिसांना कळवण्यात आले. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बेशुद्धावस्थेत राजेश यांना राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. पण दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai a 42 year old man was murdered at kanjurmarg the body was found in the metro car shed area mumbai print news ssb