मुंबई : भायखळा येथील बी. ए मार्गावरील न्यू ग्रेड इंस्टा मिल जवळच्या एका बहुमजली इमारतीला शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास अचानक आग लागली. सद्यस्थितीत अग्निशमन दलाचे जवान या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत असून आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत. या आगीत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.
भायखळ्यातील सालसेट या ५७ मजली इमारतीच्या ४२ व्या मजल्यावर आग लागली आहे. आग लागल्याचे समजताच इमारतीतील रहिवाशांना सुरक्षेच्या कारणास्तव इमारतीतून पळ काढला. तसेच, दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, पोलीस, संबंधित पालिका विभाग कार्यालयातील कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आगीची वाढती तीव्रता लक्षात घेऊन अग्निशमन दलातर्फे आगीला १० वाजून ४२ मिनिटांनी क्रमांक एकची वर्दी देण्यात आली. सद्यस्थितीत आगीची धग वाढत असून अग्निशमन दलातर्फे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.